पुणे : ‘आमचे’ म्हणूनच रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांचा पराभव कोणत्या कारणांनी झाला, त्यामागे कोण होते याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार शहर काँग्रेसमध्ये लवकरच धक्कादायक बदल केले जातील. काँग्रेसचे म्हणून धंगेकर यांनी काय केले याची माहितीही मागविली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये आलेले आणि भाजपच्या बालेकिल्ल्यातील विजयानंतर काँग्रेसला ‘जवळचे’ झालेले रवींद्र धंगेकर पुणे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वत:च काँग्रेसला अंतर देणार, की काँग्रेस त्यांच्यापासून अंतर राखणार, असा प्रश्न शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. काँग्रेसमध्ये असूनही कधी शिवसेना कार्यकर्त्याच्या, तर कधी ‘मनसे’ शैलीप्रमाणे ‘खळ्ळखट्याक’च्या भूमिकेत धंगेकर वावरत असल्याची काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याचे पडसाद काँग्रेसच्या वर्तुळात उमटले. काँग्रेस पदाधिका-यांकडून याबाबतीत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच त्याची दखल काँग्रेस प्रदेध्याक्षांकडूनही घेण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अगरवालचा भागीदार अटकेत, जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात छोटा राजनच्या नावाने धमकी

धंगेकर यांना काँग्रेसचे म्हणूनच उमेदवारी दिली होती. विधानसभा पोटनिवडणुकीतही तोच विचार होता. ते काँग्रेसभवनात येतात. पण काही तक्रारी असतील तर त्याची दखल घेतली जाईल. त्याचा अहवाल मागविला जाईल. कोणी काय काम केले, पडद्यामागे कोणी भाजपचे काम केले का याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार शहर काँग्रेसमध्ये बदल केले जातील, असे नाना पटोले यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनीही त्याबाबतची भूमिका मांडली. लोकसभा आणि विधानसभा मतदासंघनिहाय निरिक्षकांच्या नियुक्त्या जाहीरपणे झाल्या होत्या. त्या सर्वांचा अहवाल देखीव श्रेष्ठींकडे पोहोचला असेल. त्यावर पक्षश्रेष्ठींकडून योग्य कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader nana patole said change in executive of pune city congress soon pune print news apk 13 css