पुणे : सक्तवसुली संचलनालय (इडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानंतर (सीबीआय) आता प्राप्तिकर विभागाला हाताशी धरून मोदी सरकारने बँक खाती गोठवून काँग्रेसची आर्थिक कोंडी केली आहे. ‘हात-पाय बांधून निवडणूक लढविण्याची कबड्डी खेळा’, असे सांगितले जात आहे. सरन्यायाधीशांना वगळून निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीचा कायदा बदलून मोदी सरकारने आपल्या मर्जीतील व्यक्तींची आयुक्तपदी नियुक्ती केली. अशा निवडणूक आयोगाकडून काय अपेक्षा करणार?, असा सवाल उपस्थित करून येनकेनप्रकारेण निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.

काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस भवन येथे आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीका केली. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, अनंत गाडगीळ, दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : बजाजची सीएनजी दुचाकी रस्त्यावर कधी येणार? राजीव बजाज यांनीच दिलं उत्तर

चव्हाण म्हणाले की, देशातील प्राप्तिकर कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत पक्षाला प्राप्तिकर भरावा लागत नाही. मात्र, पक्षाला मिळालेल्या देणग्यांचा ताळंबेद आणि व्यवहार हे पक्षांना व्यवहार निवडणूक आयोगाला सादर करावे लागतात. २०१७-१८ मध्ये काँग्रेसला काही देणग्या मिळाल्या होत्या. केरळमधील पुराच्या घटननंतर पक्षाच्या सर्व खासदारांनी देशभरातून एक महिन्याचा निधी  जमा करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविला होता. या गडबडीत पक्षाला मिळालेल्या देणग्यांची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यायला आठवडाभर उशीर झाला. माहिती उशिरा दिल्याचा दंड दहा हजार रुपये आहे. मात्र, आता आठ वर्षांनी ही बाब कोदून काढत या विषयात आता पक्षाला नोटीस पाठवून २१० कोटी रुपयांचा दंड बजावला आहे. हा दंड भरला नाही म्हणून विभागाने काँग्रेस पक्षाची चार बँकांतील ११ खाती गोठविली आहेत. आता दहा रुपयांचा व्यवहारही आम्हाला करता येणार नाही. विजयाचा आत्मविश्वास गमावलेले मोदी निवडणुकीत आमचा पराभव व्हावा म्हणून हे करत आहेत. ही कसली लोकशाही? सीताराम केसरी खजिनदार असतानाच्या काळात १९९४ मधील त्रुटीची नोटीस पक्षाला बजावण्यात आली आहे. आम्हाला न्याय मिळेल पण तोपर्यंत निवडणुका होऊन जातील त्याचे काय?

हेही वाचा : दूध आणि पोषण आहार पुरवठ्यात कोट्यवधींचा घोटाळा; आमदार रोहित पवार यांचा आरोप

निवडणूक रोख्याच्या कायदा घटनाबाह्य असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा बरखास्त केला, याकडे लक्ष वेधून चव्हाण म्हणाले की, सगळी माहिती आता उघड झाली आहे. इडी-सीबीआय छापा टाकून त्याच्याकडून देणगी घ्यायची. हे खंडणीचे मोठे जाळे आता उघड झाले आहे. ही निवडणूक आता जनतेने हाती घेत या देशातील लोकशाही कायम ठेवली पाहिजे. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्यांना अटक झाली आहे. त्यामुळे बाकीच्या मुख्यमंत्र्यांनी जरा सांभाळून राहिले पाहिजे. अशा प्रतिकूल परिस्थतीमध्ये आम्ही न डगमगता ताकदीने लढून  महाविकास आघाडीला प्रचंड मोटा विजय देण्यासाठी झटणार आहोत

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले …

  • राज्यामध्ये पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. प्रत्येक टप्प्यासाठी ४० स्टार प्रचारक म्हणून यादी जाहीर केली जाईल. सगळी प्रक्रिया पार पाडणार आहोत. दारोदारी जाऊन उमेदवार पोहोचत आहेत. पायाला भिंगरी लावून सगळे काम करत आहेत  पुण्यात धंगेकरांचा विजय निश्चित आहे.
  • सांगलीची जागा आमच्याकडे रहावी ही आमची आग्रही मागणी आहे. त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याने भाष्य करणे योग्य होणार नाही.
  • विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी करण्याचे काम मोदींकडून केले जात आहे हे वंचित बहुजन आघाडीने समजून घ्यावे.
  • वसंत मोरे आम्हाला भेटून गेले होते. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण, तिकिट एकालाच मिळणार आहे हे सर्वांना ठाऊक आहे.

हेही वाचा : डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

नशीब, ‘हू इज शरद पवार?’ असे नाही विचारले

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘हू इज धंगेकर?’, असा प्रश्न केला होता. याकडे लक्ष वेधले असता ‘नशीब बारामतीमध्ये गेल्यानंतर त्यांनी ‘हू इज शरद पवार?’, असे विचारले नाही, अशी टिप्पणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Story img Loader