पुणे : ‘भारतीय जनता पक्षाला काहीही करून नेहरू-गांधी परिवाराची बदनामी करायची आहे. नॅशनल हेराॅल्ड प्रकरण हा त्याचाच भाग असून, देशातील अन्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित केले जात आहे,’ अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव गौडा यांनी केली.
शहर काँग्रेसच्या वतीने गौडा यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन सोमवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
‘नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात पैशांची कोणतीही देवाणघेवाण झालेली नाही. जे काही आहे ते सगळे कागदोपत्री आणि कायदेशीर आहे. मात्र, केंद्र सरकार सक्तवसुली संचालनालयासारख्या सरकारी यंत्रणेचा वापर करून नेहरू, गांधी परिवाराची बदनामी करण्यासाठीच हे प्रकरण पुढे करीत आहे. स्वातंत्रलढ्यातील जनतेचा आवाज झालेल्या ‘नॅशनल हेराल्ड’ वर्तमानपत्राला आर्थिक स्थिरता देण्यासाठी, कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन देण्यासाठी काँग्रेसने वेळोवेळी मदत केली. हा सर्व व्यवहार कायदेशीर आहे. मात्र, सरकारच्या दबावातून गांधी कुटुंबाबाबत कारवाई केली जात आहे, असे गौडा यांनी सांगितले.
‘अमेरिकेचे नवे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नीतीमुळे भारतासमोरही धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठीच सरकारने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावर लक्ष केंद्रित केले आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.