पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याला पुणे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींनी विरोध दर्शविला असून, मंडई चौकात आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौर्‍यावर येत आहेत. ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात ११ वाजता जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध होत आहे.

हेही वाचा – नरेंद्र मोदी यांना आज ‘टिळक पुरस्कार’; शरद पवार यांची उपस्थिती, मणिपूरप्रश्नी आंदोलनात राष्ट्रवादीचा सहभाग

आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहरात कार्यक्रमासाठी येत आहेत. पण मागील तीन महिन्यांपासून मणिपूर राज्य जळत आहे. तेथील महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यावर आजपर्यंत पंतप्रधान मोदी यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली नाही किंवा त्या ठिकाणी गेले नाही. तर ते देशातील अनेक भागांत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जात आहेत. ही निषेधार्थ बाब असून पंतप्रधानांनी पुण्यातील कार्यक्रमाला येण्यापेक्षा मणिपूर येथे जाऊन जनतेला न्याय देण्याच काम करावे.

भाजपाने आम्हाला जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली आहे. आम्हाला दगड मारल्यास आम्ही तो दगड खाऊ असेही धंगेकर म्हणाले.

हेही वाचा – ‘टीईटी’ गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरतीत अपात्र करण्याची मागणी

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यास शरद पवार यांनी जाऊ नये अशी विनंती काँग्रेस पक्षातील नेत्यांनी केली आहे. त्यावर धंगेकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असून अनेकांना पडत्या काळात शरद पवार यांनी साथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी शरद पवार यांनी मदत केली होती. नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल या भावनेतून शरद पवार पुरस्कार सोहळ्यास जात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader ravindra dhangekar opposes pm modi visit to pune svk 88 ssb