पुणे : काँग्रेसमधील काही नेते कार्यकर्त्यांना मोठे होण्याची संधी देत नाहीत, असा आरोप करत काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि काही पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. प्रवेशाची वेळ निश्चित झाली नसली, तरी यासंदर्भातील भेटीगाठींचे अंतिम टप्पे पार पडल्याची माहिती पुढे आली आहे.
अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही संधी मिळत नसल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. याशिवाय, शहरातील वरिष्ठ नेते संघटन कार्यात मदत करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमध्ये जुन्याच पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे. या सर्व कारणांमुळे रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्या समवेत बैठकही झाली असल्याची चर्चा आहे.