काँग्रेसने सुरू केलेल्या राज्यव्यापी शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचा एक भाग म्हणून पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहभागी होत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी मागणी सरकारकडे गुरुवारी केली.
काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड, आमदार दीप्ती चवधरी, पक्षाचे नेते उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, चंद्रकांत छाजेड, शरद रणपिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम आणि पक्षाच्या नगरसेवकांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरुद्ध काढण्यात आलेल्या या मोर्चात पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांची भाषणे झाली. भाजपच्या अनेक धोरणांचा आणि निर्णयांचा यावेळी तीव्र निषेध करून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्यातील सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली.
निवडणूक काळात भाजपने जी आश्वासने जनतेला दिलेली होती त्यांची पूर्तता सरकारने केलेली नाही. देशातील भाववाढ रोखणेही सरकारला शक्य झालेले नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी जी आश्वासने देण्यात आलेली होती त्यांचीही पूर्तता सरकारने केलेली नाही. या आश्वासनांची पूर्तता तातडीने करून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी काँग्रेसचा धडक मोर्चा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहभागी होत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी मागणी सरकारकडे गुरुवारी केली.
First published on: 10-07-2015 at 03:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress march farmers agitation