वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

सहकारनगर भागात गेल्या काही आठवडय़ांपासून वीजपुरवठय़ात सातत्याने खंड होत असल्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पद्मावती येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी विविध समस्या महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच या समस्यांबाबतचे निवेदनही अधिकाऱ्यांना देण्यात आले.

महावितरणच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी सहकारनगर परिसरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. महावितरणचा या गोंधळी कारभाराचा निषेध करण्यासाठी सहकारनगर परिसरातील शेकडो नागरिक यात सहभागी झाले होते. माजी उपमहापौर आबा बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस अमित बागूल यांनी हे आंदोलन केले.

गेल्या सहा महिन्यांपासून आठवडय़ातून तीनचार वेळा विद्युतपुरवठा खंडित होत आहे. ऐन उन्हाळा सुरू असताना वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या संदर्भात तक्रारीसाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशी तक्रार या वेळी करण्यात आली. स्थानिक पातळीवर कॉलसेंटरचा नंबर सुरू करावा, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. युवक काँग्रेसचे सागर आरोळे, विजय बिबवे, विक्रम खन्ना, बाबालाल पोकळे, महेश ढवळे, राम रणपिसे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.