पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्यांवर अन्याय करून ज्या कार्यकर्त्यां, नगरसेविका कधी काँग्रेस भवनातही येत नाहीत त्यांना महापालिकेत तसेच अन्य ठिकाणच्या महत्त्वाच्या समित्या आणि पदे कशी काय दिली गेली, असा संतप्त सवाल महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी मंगळवारी पक्षाच्या निरीक्षकांसमोरच केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी प्रदेश काँग्रेसने सुरू केली असून त्या तयारीचा एक भाग म्हणून काँग्रेसतर्फे लवकरच मेळावे आयोजित केले जाणार आहेत. राज्य आणि केंद्र शासनाने अंमलबजावणी केलेल्या विविध योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मेळावे घेतले जाणार आहेत. त्या तयारीसाठी मंगळवारी शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस भवनात बोलावण्यात आली होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक अॅड. सुरेश कुऱ्हाडे या बैठकीसाठी पुण्यात आले होते. पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक, उपमहापौर दीपक मानकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
बैठकीत पक्षांतर्गत वाद आणि अन्य काही वादाचे मुद्दे उपस्थित झाले. काँग्रेसचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या तसेच पक्षाशी आणि काँग्रेस भवनाशी एकनिष्ठ असलेल्या महिला कार्यकर्त्यांना कोणत्याही समित्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्याउलट, ज्या कार्यकर्त्यां कधीही काँग्रेस भवनात येत नाहीत, पक्षाचे काम करत नाहीत, त्यांना रेशन, वीज वितरण आदी महत्त्वाच्या समित्या देण्यात आल्या. या समित्या देताना महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा का करण्यात आली नाही, असा प्रश्न कमल व्यवहारे यांनी बैठकीत विचारला. शहर युवक काँग्रेसच्या कारभारावरही या वेळी टीका करून नाराजी व्यक्त करण्यात आली.
‘काँग्रेस भवनातही न येणाऱ्यांना महत्त्वाच्या समित्या कशा दिल्या?’
ज्या कार्यकर्त्यां, नगरसेविका कधी काँग्रेस भवनातही येत नाहीत त्यांना महापालिकेत तसेच अन्य ठिकाणच्या महत्त्वाच्या समित्या आणि पदे कशी काय दिली गेली...
First published on: 05-06-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress meeting for coming election in congress bhavan