ड्रग्ज उत्पादन आणि तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर त्याने कोर्टात हजर केलं जात असताना मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही, तर मला पळवून लावण्यात आलं, असा गंभीर आरोप केला. यावर या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
रविंद्र धंगेकर म्हणाले, “ललित पाटीलचा तुरुंग ते पंचतारांकित हॉटेल असा प्रवास महिनोंमहिने सुरू होता. आज पुणे शहर अमली पदार्थाने वेढलं आहे. अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत. ललित पाटील केवळ पुण्यापुरता मर्यादित नव्हता. तो महाराष्ट्रभर आणि भारताच्या सीमेपर्यंत हे काळेधंदे करत होता. त्याचे मोठे कारखानेही उद्ध्वस्त झालेले आपण पाहिले.”
“आजी-माजी पोलीस अधिकारी ललित पाटीलबरोबर आहेत”
“या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पुणे पोलिसांनी ललित पाटीलला पंचतारांकित सेवा दिली आणि पळून जाण्यासाठी मदत केली. हे इथंच थांबलं नाही, तर १५ दिवस तो सापडत नव्हता. पुणे पोलिसांचे १० पथकं वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आले. परंतु, आजी-माजी पोलीस अधिकारी ललित पाटीलबरोबर आहेत हे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. तो हा व्यवसाय एकटा करत नव्हता. त्याला पोलिसांचा वरदहस्त होता,” असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.
“कुठल्यातरी पोलिसाने त्याला मॅनेज करून तिथं थांबवलं “
रविंद्र धंगेकर पुढे म्हणाले, “कोट्यावधी रुपयांच्या अमली पदार्थांचा काळाधंदा करणारा ललित पाटील सापडला, पण मुंबई पोलिसांना सापडला. म्हणजेच कुठल्यातरी पोलिसाने त्याला मॅनेज करून तिथं थांबवलं आणि तिथून त्याला अटक केली. हे मुंबई पोलीस व पुणे पोलिसांचं अपयश आहे. हा अचानक पहाटे सापडतो, कोणता पोलीस पहाटे उठतो.”
हेही वाचा : “मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं, सर्वांची नावं सांगणार”, ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस म्हणाले…
“पुणे पोलिसांनी ललित पाटीलला पळवून लावण्यासाठी प्रयत्न केले”
“पुणे पोलिसांनी ललित पाटीलला पळवून लावण्यासाठी प्रयत्न केले. यात पुणे पोलिसांचं अपयश आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकणारा राजरोसपणे फिरतो कसा? पोलिसांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केली ही वस्तूस्थिती आहे. सर्वांनी त्याचा व्हिडीओ पाहिला आहे. तो मुंबई पोलिसांना सापडला म्हणजे त्याची पाळंमुळं अनेक अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली आहेत. याचा तपास पुणे पोलिसांकडूनही होणार नाही आणि मुंबई पोलिसांकडूनही होणार नाही. त्याचा तपास सीआयडीकडे द्यावा,” अशी मागणी धंगेकरांनी केली.