पुणे: मागील काही दिवसांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढत आहे. याचबरोबर आरटीओच्या ऑनलाइन सुविधा मिळत नसल्याचे प्रकार घडत आहेत. यासह इतर अनेक मुद्द्यांवर कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
आमदार धंगेकर यांच्यासोबत माजी आमदार मोहन जोशी हेही यावेळी उपस्थित होते. धंगेकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अजित शिंदे यांची भेट घेतली. या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर आणि इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते. आरटीओच्या सेवा मिळवण्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा पाढा धंगेकर यांनी अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला. त्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली. यावर अधिकाऱ्यांनी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा… पुणे: अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाचे महिलेकडून अपहरण; गुजरातमधील वापीतून तरुणाची सुटका
शहरात ६ हजार ६०० स्कूल बस आणि व्हॅन आहेत. त्यातील अनेक स्कूल बस आणि व्हॅनकडे आरटीओचे योग्यता प्रमाणपत्र नाही. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशी भूमिका धंगेकर आणि जोशी यांनी घेतली. याचबरोबर योग्यता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जलद पार पाडावी, अशी सूचना त्यांनी केली.
हेही वाचा… पुणे : कोंढव्यात पावसात थांबलेल्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू
आरटीओकडून वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ऑनलाइन दिला जातो. प्रत्यक्षात परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा देणाऱ्यांना पुन्हा कार्यालयात परीक्षा द्यावी लागत असल्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. याचबरोबर परीक्षेसाठी अशा उमेदवारांकडून दोनवेळा शुल्क घेतले जात आहे. यामुळे शिकाऊ परवाना देण्याची सुविधा केवळ नावालाच ऑनलाइन सुरू असल्याचे समोर आले आहे. याबाबत तातडीने मार्ग काढून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी सूचनाही धंगेकर यांनी अधिकाऱ्यांना केली.