पुणे : अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले असताना कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मात्र ‘जय श्रीरामा’चा नारा घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धंगेकर यांच्याकडून शुक्रवारी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ‘आपल्या प्रभू श्रीरामांसाठी एक दिवा लावूया, आनंदोत्सव साजरा करूया’ अशी घोषणाही धंगेकर यांनी दिली आहे.

अयोध्येतील मंदिरात प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना येत्या २२ जानेवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी राजकीय पक्ष प्रमुखांनाही निमंत्रणे देण्यात आली आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार अधीर रंजन चौधरी यांनी उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. त्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मात्र प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त कार्यक्रम आयोजित केल्याने याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा >>>सराफी पेढीतून चोरलेले पाच किलो सोने त्यांनी ठेवले केळीची बाग, पाण्याचे पाईप आणि जनावरांच्या खाद्यात; पोलिसांनी असा घेतला शोध

लोकसभेसाठी इच्छुक

आमदार धंगेकर लोकसभा निवडणुकीसाठीही इच्छुक आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व ते करत असून पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यादृष्टीने राजकीय गणिते जमविण्यासाठीच धंगेकर यांनी कसब्यात हा उपक्रम राबविल्याची चर्चा आहे. त्यानुसार शुक्रवारी शनिपार जवळील मैदानात ‘एक दिवस श्रीरामां’साठी हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच सायंकाळी महाआरतीही करण्यात आली.

Story img Loader