पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बंगिनवार यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी १६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी एका विद्यार्थ्याच्या पालकांकडे केली होती. त्यापैकी १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आशिष बंगिनवार यांना काल रंगेहाथ पकडले. या पार्श्वभूमीवर बंगिनवार यांचा काँग्रेस आणि मनसेकडून निषेध करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर हे माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आले. विचारपूस केली असता अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. हे पाहून आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी आशिष बंगिनवार यांच्या ऑफिसबाहेरील नावाच्या फलकावर शाई फेकून निषेध नोंदवत घोषणाबाजी केली.

हेही वाचा – पिंपरीत अल्पवयीन मुलांच्या ‘कोयता गॅंग’चा हैदोस! दोघांच्या डोक्यात कोयत्याने वार, दागिन्यांची लूट

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी सुमारे १५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर शासन मान्य प्रक्रियेतून प्रवेश मिळण्यासाठी २२ लाख ५० हजार रुपये शुल्क आहे. मात्र त्या व्यतिरिक्त बंगिनवार यांनी एका विद्यार्थिनीच्या पालकांकडे १६ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने काल सापळा रचून आशिष बंगिनवार यांना १६ लाख रुपयांपैकी १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तपास सुरू आहे.

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बंगिनवार यांच्या चारचाकी वाहनांवर काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या गाडीत चोर बसतो असे लिहून निषेध नोंदविला.

मनसेकडूनही निषेध

मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तर आशिष बंगिनवार यांच्या नावाच्या पाटीला प्रतिकात्मक पैशांचा हार घालण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष साबळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आशिष बंगिनवार यांच्या कार्यालयाबाहेरील नावाच्या फलकावर प्रतिकात्मक नोटांचा हार घालण्यात आला. तर कार्यालयातील साहित्यांची तोडफोड करीत निषेध नोंदवण्यात आला.

हेही वाचा – जंगलांना आग लागण्याचे प्रमाण घटले

आशिष साबळे पाटील म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे हा त्यामागील हेतू होता. पण अधिष्ठाता आशिष बंगिनवार यांनी लाच घेतल्याचे प्रकरण समोर आल्याने यामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असेल. त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mns protest against pune mnc medical college principal ashish banginwar svk 88 ssb
Show comments