शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करणारी तहकुबी महापालिकेच्या मुख्य सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने गुरुवारी बहुमताने फेटाळली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांडलेल्या या तहकुबीच्या बाजूने मनसे, भाजप आणि शिवसेना या तीन पक्षाच्या नगरसेवकांनी मतदान केले.
मुख्य सभचे कामकाज गुरुवारी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटी अभियानात पुणे आणि पिंपरीचा समावेश एकत्रितरीत्या केल्याबद्दल महापौरांच्या आसनासमोर येऊन राज्य शासनाच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. हा गोंधळ सुरू असतानाच विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी धरणातील पाणीसाठय़ाचा विचार करून महापालिका प्रशासनाने काय नियोजन केले आहे याची माहिती द्यावी, अशी मागणी करून निवदेन करण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला.
ही चर्चा सुरू असताना मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर यांनी तहकुबी वाचली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करून ही सभा पुढील महिन्यापर्यंत तहकूब करावी असे या तहकुबीत म्हटले होते. या तहकुबीला विरोध असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तहकुबीवर मतदान घेण्याचा आदेश देण्यात आला. मतदानात तहकुबीच्या बाजूने मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या तर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केले. तहकुबीच्या बाजूने ३४, तर विरोधात ५३ मते पडली आणि ही तहकुबी बहुमताने फेटाळण्यात आली.

Story img Loader