केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. आगामी काळात होणाऱ्या पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तर, आज अमित शहा यांच्या हस्ते पुणे महानगर पालिकेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष्टीत स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. असं अमित शहा यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास केंद्रीयमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात अमित शहा यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं. त्यांच्या या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची ही सिहासनावर विराजमान मूर्ती पुण्याच्या सर्व तरूणांसाठी प्रेरणास्थान असेल, याचा मला विश्वास आहे. याच उद्देशाने पुणे महापालिकेने या मूर्तीच्या स्थापनेचा निर्णय केला आहे. आज यासोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील पुतळ्याचे अनावरण झाले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्यानंरत हा देश घडवण्यात, याला मूर्त स्वरूप देण्यात मोठं योगदान राहीलं आहे आणि सर्वांना हे माहिती आहे. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अनेक प्रकारच्या वादग्रस्त मुद्य्यांवर सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम देखील त्यांनी केलं. देशातील गरीब, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी राज्यघटनेला संकल्पबद्ध करण्याचं काम आंबेडकरांनी केलं.”
तसेच, “संपूर्ण आयुष्यभर अपमान, अहवेलना, यातना सहन केल्या. किती कटूता त्यांनी सहन केली. मात्र राज्यघटनेच्या निर्माणात कधीच कटुता दिसली नाही. सर्व समाजाला एकत्र ठेवून देशाचा कसा विकास होऊ शकतो, याचा एक दस्तावेज बनवला जी की आपली पवित्र राज्यघटना आहे. आज संपूर्ण जगभरातील राज्यघटनांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारांच्या सुरक्षेच्या ज्या तरतुदी असतात, त्यांची तुलना केली तर असं दिसून येतं की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली राज्यघटना ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांना समान अधिकार देणारी राज्यघटना आहे.” असंही यावेळी शहा यांनी बोलून दाखवलं.
PHOTOS : गृहमंत्री अमित शहा यांनी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा
याचबरोबर, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या मृत्यू पश्चात देखील अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. आंबेडकरांना भारतरत्न तेव्हाच मिळालं, जेव्हा गैरकाँग्रेसी सरकार होतं. आंबेडकरांच्या जीवनाशी जुडलेल्या पाच ठिकाणांना त्यांच्या स्मृतीस्थळात बदलण्याचा निर्णय देखील कुठे ना कुठे राज्य असो किंवा केंद्र जेव्हा भाजपाची सरकारं आली तेव्हाच झाला. संविधान दिवस यासाठी साजरा केला जात नव्हता, की त्या माध्यामातून देशाच्या जनतेच्या समोर आंबेडकरांच्या गुणांचा गौरव झाला असता. पंतप्रधान मोदींनी सत्तेत येऊन संविधान दिन साजरा करण्याची सुरूवात केली आणि जेव्हा जेव्हा संविधान दिवस पंतप्रधान मोदी साजरा करतात, काँग्रेस आज देखील त्याचा बहिष्कार करते.” असा आरोपही गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी काँग्रेसवर केला.