पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हकालपट्टीची कारवाई केली, ती अन्यायकारक असल्याचे सांगत आम्ही पक्षातच असून काँग्रेसचा गटनेता आणि विरोधी पक्षनेताही आमचाच राहील, अशी ठाम भूमिका भोईर व नढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मांडली. आमच्यासोबत काँग्रेसचे आठ नगरसेवक असून त्यांच्याविषयी पक्षाने भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून पुढील निर्णय घेता येईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
आजी-माजी शहराध्यक्षांमधील संघर्षांमुळे काँग्रेसमधील वातावरण ढवळून निघाले आहे. हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर भोईर व नढे यांनी समर्थक नगरसेवकांसह पुढील भूमिका स्पष्ट केली. नगरसेवक राहुल भोसले, गणेश लोंढे, आरती चोंधे, विमल काळे, सविता आसवानी, शकुंतला बनसोडे यावेळी उपस्थित होते. नगरसेवक जालिंदर शिंदे व गीता मंचरकर आमच्यासोबत असल्याचा दावाही त्यांनी केला. आम्ही पक्षविरोधी कारवाया केल्या नसल्याचे सांगून भोईर म्हणाले, कैलास कदम यांना काँग्रेसच्या दोन तृतीयांश नगरसेवकांचा विरोध आहे, त्यांची गटनेतेपदावरील नियुक्ती बेकायदेशीर आहे. कोणते क्रांतिकारक काम केले म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. अन्य नगरसेवकांपैकी कोणालाही पद द्यायला हवे. मात्र बहुमताला डावलण्यात आले. गटनेतेपदाचा फेरविचार करावा. कदमांना विरोध असल्याचे दहा नगरसेवकांचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले असून त्यांची हकालपट्टी निश्चित आहे. नढे हेच विरोधी पक्षनेतेपदी कायम राहतील व त्यांच्यानंतर राहुल भोसले त्या पदावर असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवकांच्या सह्य़ा फसवून घेतल्या
निरीक्षक शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत कलासागरला झालेल्या बैठकीत नगरसेवकांच्या सह्य़ा घेतल्या आणि कैलास कदम यांच्या शिफारशीसाठी वापरण्यात आल्या. ही नगरसेवकांची फसवणूक आहे, अशी तक्रार विनोद नढे, आरती चोंधे यांनी केली. बच्छाव यांनी प्रदेशाध्यक्षांना सादर केलेला अहवाल जाहीर करावा, अशी मागणी भाऊसाहेब भोईरांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या कारवाईला पिंपरीत भोईर, नढे यांचे आव्हान!
आजी-माजी शहराध्यक्षांमधील संघर्षांमुळे काँग्रेसमधील वातावरण ढवळून निघाले आहे. हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर ...
First published on: 15-02-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress pimpri challenge