राष्ट्रवादीशी कडवा संघर्ष असूनही आघाडीच्या बेडय़ांमुळे करावा लागणारा संसार, जागावाटपात ‘पंजा’ गायब होण्याची धास्ती, पक्षांतर्गत गटबाजी, निष्ठावानापेक्षा पक्ष खड्डय़ात घालणाऱ्यांची संख्या अधिक आणि अजितदादांच्या ‘दादा’ गिरीचे कडवे आव्हान अशा प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसचे पिंपरी शहराध्यक्षपद मिळालेल्या सचिन साठे यांनी, पक्षशिस्त व निष्ठेला सर्वाधिक महत्त्व देत आगामी काळात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याचा आणि महापालिकेची सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार रविवारी पहिल्याच पत्रकार परिषदेत व्यक्त केला.  
शहराध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सचिन साठे यांनी आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली. माजी महापौर आझम पानसरे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, महिलाध्यक्षा ज्योती भारती, माजी नगरसेवक बाबा तापकीर, श्यामला सोनवणे, निगार बारस्कर आदी उपस्थित होते. साठे म्हणाले, काँग्रेसची पुनर्बाधणी करणार असून सर्वाना बरोबर घेऊन काम करू. ‘काँग्रेस आपल्या दारी’ उपक्रम राबवणार आहे. पक्षात यापुढे गटबाजी होणार नाही. कार्यकर्ते व नगरसेवकांचे काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवून देण्याचे ध्येय आहे. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यास कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यावे. चिंचवड मतदारसंघाची मागणी राष्ट्रवादीकडून होत असली, तरी शहरातील एक जागा काँग्रेसला हवीच, यासाठी आग्रह धरू. कोणती जागा हवी, या विषयीचा निर्णय सर्वाशी चर्चा करून पक्षश्रेष्ठींना कळवू. पूर्वी, पिंपरी पालिकेची सत्ता काँग्रेसकडे होती, ती पुन्हा काँग्रेसकडे आणण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळवा, गेल्या निवडणुकीतील त्यांचा अनुभव वाईट आहे, असे ते म्हणाले.
‘जगतापांचा दावा राहिला नाही’
संलग्न आमदाराने पाठिंबा दिलेल्या पक्षासाठी जागा सोडण्याचे धोरण पक्षप्रमुखांनी आखले असले, तरी चिंचवडला तो नियम लागू पडत नाही. कारण, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोकसभेच्या वेळी पक्ष सोडून शेकापची उमेदवारी स्वीकारली होती, त्यामुळे त्यांचा दावा राहिला नाही, याकडे आझम पानसरे यांनी लक्ष वेधले. शनिवारी महिला काँग्रेसच्या मेळाव्यात जे घडले. त्यामागे कोणालाही डावलण्याचा हेतू नव्हता. अचानक कार्यक्रम लावण्यात आल्याने अनेकांना निरोप देता आले नाहीत, अशी सारवासारव त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress press conference sachin sathe