काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून पिंपरी-चिंचवडला पुन्हा डावलण्यात आले, त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने ही जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तर, काँग्रेसने तीव्र निदर्शने करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांची फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे.

केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील तिसरी यादी मंगळवारी दिल्लीत जाहीर केली. नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबवली, ठाणे आणि औरंगाबाद या पाच शहरांचा समावेश त्यात होता. मात्र, पिंपरी-चिंचवडला डावलण्यात आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र भाजप विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपवर खापर फोडतानाच मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, केंद्र सरकारने स्थानिक निवडणुकांमुळे ही कृती जाणीवपूर्वक केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीने शहरातील सत्तेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडचा कायापालट केला. केंद्रात आघाडी सरकार असताना ‘बेस्ट सिटी’, तर राज्यातील स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळालेल्या िपपरी-चिंचवडला डावलून भाजपप्रणीत केंद्र सरकारने शहरवासीयांचा अपमान केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता भाजपला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

चिंचवडगावातील चापेकर चौकात काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेविका गिरिजा कुदळे, विद्या नवले, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, नरेंद्र बनसोडे, संदीपान झोंबाडे, तारीक रिजवी, बाळासाहेब साळुंके आदी सहभागी झाले होते. या वेळी बोलताना साठे म्हणाले,की भाजप-सेनेने ‘खोटं बोल पण रेटून बोल’चा प्रत्यय पुन्हा दिला आहे. तिसऱ्या यादीतही ठेंगा दाखवून केंद्राने शहरवासीयांचा अपमान केला आहे. शहरातील नागरिकांची मते घेऊन युतीचे आमदार-खासदार निवडून आले. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. भ्रष्ट मंत्र्यांना ‘क्लीन चीट’ देणारे मुख्यमंत्री शहरवासीयांच्या दृष्टीने ‘चीटर’ मुख्यमंत्री ठरले आहेत. सत्तेची फळे एकत्र चाखणारी शिवसेनाही तितकीच जबाबदार आहे. दोन्ही पक्षांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress protest against bjp government for ignoring pimpri chinchwad from smart city