काँग्रेसचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अवघ्या देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून भाजपविरोधात आंदोलन केले जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरात काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले असून हे सरकार म्हणजे हम दो हमारे दो असे आहे. (नरेंद्र मोदी आणि अमित शहा, अदानी आणि अंबानी) अशी टीका केली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा काम मोदी सरकार करत आहेत असा आरोप देखील त्यांनी केला. पहिले लडे थे गोरे से अब लडेंगे चोरो से अशी घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
कैलास कदम म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याच काम मोदी सरकार करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. भाजपाचे सरकार येऊन नऊ वर्ष झाली तरी त्यांच्या कार्यकाळात प्रचंड महागाई वाढली आहे. जाती- धर्मामध्ये अराजकता माजवण्याचे काम हे सरकार करत आहे. असा आरोप कदम यांनी केला. पुढे ते म्हणाले की, या देशात केवळ एकच काम सुरू आहे. हम दो हमारे दो, म्हणजे मोदी आणि शहा आणि अदानी आणि अंबानी. याभोवती देशाचं राजकारण सुरू आहे. पुढे ते म्हणाले की, सर्व जाती धर्माचे लोक, शेतकरी यांना एक संघ ठेवण्याचे काम भारत जोडो यात्रेतून राहुल गांधीने केले. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत राहुल गांधींच्या पद यात्रेला भरगोस प्रतिसाद मिळाला म्हणून हे भाजपा सरकार घाबरले आहे. राहुल गांधींमध्ये बलिदानाचे रक्त आहे. काँग्रेसमध्ये बलिदानाची परंपरा आहे. यातून च हा काँग्रेस पक्ष तयार झाला आहे असते म्हणाले आहेत.
तर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले की, राहुल गांधींच्या खासदारकीचे सदस्यत्व रद्द झाले हे पाहता हा देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०२४ ची निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होईल. सरकार च्या विरोधात जो बोलतो तो देशद्रोही ठरतो आहे. अशा पद्धतीने वातावरण या देशात या आगोदर कधीही नव्हते. भारतीय संविधान या गोष्टीना मान्यता देत नाही. पक्ष आणि देश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षाविरोधात बोललं म्हणजे देशाविरोध बोलणं हे कधी पासून व्हायला लागल? अस म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.