भाजपा नेते किरीट सोमय्या यांना दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर पालिकेच्या पायऱ्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. या मुद्द्यावरून भाजपानं रान उठवल्यानंतर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या पुणे महानगर पालिकेमध्ये आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ज्या पायरीवर किरीट सोमय्या दोन दिवसांपूर्वी तोल जाऊन पडले होते, त्याच पायरीवर भाजपानं त्यांचा सत्कार केला. या कृतीचा निषेध म्हणून काँग्रेसकडून अजब पद्धतीने त्यावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेसनं चक्क त्या पायरीवर गोमूत्र टाकून ती पायरी स्वच्छ केली आहे!
किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाल्याच्या प्रकरणावरून भाजपा आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. हे राजकारण आज पुण्यात शिगेला पोहोचलं आणि त्याचं पर्यवसान पालिकेच्या पायऱ्यांवर गोमूत्र शिंपडण्यात झालं!
पायरीवर गोमूत्र आणि गुलाबपाणी!
“पुण्यात खड्डे, पाणी, रस्त्याचे इतके प्रश्न असताना देखील केवळ किरीट सोमय्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून भाजपाने या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून किरीट सोमय्यांचा सत्कार या पायरीवर करण्याचं काम केलं. आम्ही गांधीगिरी मार्गाने काँग्रेस पक्षाच्या वतीने ती पायरी गोमूत्र आणि गुलाब पाण्याने स्वच्छ करत आहोत. भाजपानं केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही ही पायरी स्वच्छ करत आहोत”, असं पायरी स्वच्छ करणारे काँग्रेस कार्यकर्ते व्हायरल व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.
नेमकं काय घडलं?
किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.
शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले. पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.
या घटनेनंतर किरीट सोमय्यांना उपचारांसाठी पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.