पेट्रोल-डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारने कर लावले आहेत. यामुळे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून ते सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज राज्यभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसने सायकल रॅली आयोजित केली होती. मात्र, या रॅलीत केवळ १० ते १५ कार्यकर्तेच आल्याने हे आंदोलन चांगलेच फसले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महात्मा गांधी यांच्या फोटोला हार घालून आणि अभिवादन करून काँग्रेसच्या सायकल रॅलीला भक्ती शक्ती येथून सुरुवात झाली. परंतु सकाळी दहाची वेळ देऊन कार्यकर्ते उशिरा पोहचल्याने पिंपरीच्या आंबेडकर चौकात येण्यासाठी तब्बल दोन तास उशीर झाला. याच कारणाने की काय काँग्रेस च्या सायकल रॅलीत केवळ १० ते १५ कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे या रॅलीचा फज्जा उडाला असच म्हणावं लागेल. यावेळी शहराध्यक्ष सचिन साठे हेच किल्ला लढवत होते. रॅलीच्या पुढे सायकल चालवत सचिन साठे ‘पेट्रोल दरवाढ मागे घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘नरेंद्र मोदी हाय हाय’, ‘भाजपा सरकारचा निषेध असो’, अशा अनेक घोषणा देत होते. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित २० वर्ष सत्ता होती. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवत आपले वर्चस्व सिद्ध करत पालिकेवर एकहाती  सत्ता आणली. मात्र, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसलाही भाजपाने धुळ चारली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेसचे बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते राहिले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात काळात काँग्रेस ला पुन्हा आपली ताकद सिद्ध करावी लागणार असल्याचा सूर व्यक्त होत आहे.

तर दुसरीकडे मुंबईत प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्त्वाखाली चर्चगेट रेल्वे स्थानकावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पुण्यात काँग्रेस पक्षाकडून महात्मा फुले मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बैलगाडीवर दुचाकी ठेवून हा मोर्चा काढण्यात आला.तर या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले.यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress protest against petrol diesel hike in maharashtra