महापौर वैशाली बनकर यांच्या राजीनाम्याचे अवलोकन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या खास सभेत हा विषय पुकारला जाताच काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी सभात्याग करून राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला. महापौर पदासाठीची निवडणूक पुढील महिन्यात होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचे या सभात्यागामुळे स्पष्ट झाले.
पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे महापौर वैशाली बनकर यांनी १२ ऑगस्ट रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे अवलोकन करण्यासाठी सोमवारी खास सभा बोलावण्यात आली होती. सभेची कार्यपत्रिका सुरू झाल्यानंतर महापौरांच्या राजीनाम्याचा विषय वाचून दाखवण्यात येत असतानाच काँग्रेसचे गटनेता आणि विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला. राष्ट्रवादीला याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे त्या पक्षाला या सभात्यागाचा चांगलाच धक्का बसला. या सभात्यागानंतर महापौरांच्या राजीनाम्याचा विषय वाचून दाखवण्यात आला आणि सभा तहकूब करण्यात आली.
महापौर राजीनामा देत असल्याबाबतची माहिती राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांना दिली होती. मात्र, महापालिकेत ही घडामोड होत असताना काँग्रेसच्या गटनेत्याला वा अन्य कोणालाही त्याची माहिती देण्यात आली नव्हती. तसेच राजीनामा अवलोकनासाठी जी खास सभा बोलावण्यात आली त्याबाबतही राष्ट्रवादीने कोणतीही चर्चा काँग्रेसबरोबर केली नाही. या गोष्टींचा राग सोमवारी सभात्यागातून व्यक्त करण्यात आला.
प्रभाग क्रमांक ४० च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा करू नये असे ठरले होते. त्यानुसार ठाणे व पिंपरी चिंचवड मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी पुण्यात उमेदवार उभा करून मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळला नाही. अशा प्रकारे तो पक्ष आम्हाला सदैव गृहीत धरून सत्तेत राहणार असेल, तर आम्हालाही आमच्या निर्णयाचे स्वातंत्र्य आहे, असे अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेता पद काँग्रेसला देण्याच्या निर्णयाला मनसेचे वसंत मोरे यांनी आव्हान दिले असून या दाव्याची सुनावणी मंगळवारी (२० ऑगस्ट) उच्च न्यायालयात होत आहे. त्याचा निकाल प्रलंबित आहे. येथील सर्वच घडामोडींबाबत मंगळवारी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांशी आम्ही चर्चा करणार आहोत. आमचे वरिष्ठ पुढील निर्णय देतील त्यानुसार आम्ही धोरण ठरवू. म्हणून तूर्त महापौर पदाच्या वादापासून आम्ही दूर राहिलो आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले.