कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून भाजपाला पराभवाचा धक्का देणारे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजयानंतर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. धंगेकरांनी तब्बल ११ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. गेल्या २८ वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपाकडे होते. मात्र, आता पुन्हा एकदा या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार झाल्यामुळे या निकालावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना निवडणूक काळात गैरप्रकार करणाऱ्यांना अद्दल घडवण्याबाबत सूचक विधान केलं आहे.
कसब्यात काय लागला निकाल?
कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा पराभव केला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत टिळक कुटुंबातीलच एका व्यक्तीला आमदारकीचं तिकिट दिलं जावं, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. टिळक कुटुंबीयांकडूनही तशी इच्छा व्यक्त केली गेली. मात्र, भाजपाकडून माजी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे या मतदारसंघात भाजपाविरोधात नाराजी असल्याचं सांगितलं गेलं. याचाच फटका भाजपाला बसल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
“करोडोंचा पाऊस पडल्यानंतरही…”
दरम्यान, मतदानाच्या आधी भाजपाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला होता. त्याचा निषेध म्हणून त्यांनी आंदोलनही केलं होतं. आता विजयी झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी सूचक प्रतिक्रिया देत गैरप्रकार करणाऱ्यांना अद्दल घडवण्याचे संकेत दिले आहेत. “मी ज्या दिवशी फॉर्म भरला, त्याच दिवशी सांगितलं की माझा विजय नक्की आहे. करोडोंचा पाऊस पाडल्यानंतरही जनतेनं ते पैसे स्वीकारले नाहीत. शेवटी पैसा हरला आणि कार्यकर्ता जिंकला. जनशक्ती जिंकली आणि धनशक्ती हरली. माझ्या अनेक निवडणुका धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा झाल्या आहेत”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
कसब्याच्या निकालाने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार
“गिरीश बापट यांनी कधी असं केलं नाही”
“कुरघोडीचं राजकारण, पोलीस यंत्रणा, निवडणूक यंत्रणा, गुंडांच्या मार्फत केलेला प्रचार.. हा सगळा किळसवाणा प्रकार होता. मीही गिरीश बापटांविरोधात निवडणूक लढवली आहे. पण त्यांनी कधी असं केलं नाही. यावेळी जिवाशी खेळण्यापर्यंत ही निवडणूक गेली होती. पोलिसांकडून दमदाटी करणं, गुंडांमार्फत धमकी देणं असे प्रकार झाले”, असा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
मी गिरीश बापटांसमोरही लढलो, पण असले प्रकार त्यांनी केले नाहीत – रवींद्र धंगेकर
“माफ करणं हा माझा धंदा आहे. मी सगळ्यांना माफ करतो. आजचा मित्र उद्याचा शत्रू, परवाचा मित्र. राजकारणात कायम मैत्री पाळायला लागते. माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझं वाक्यच असतं. तुम्ही कितीही पोलीस आणा, कितीही पैसे वाटा, कितीही गुन्हेगार आणा… आज माझी पाळी आली आहे. ज्यांनी ज्यांनी गैरप्रकार केले त्यांना आता मी व्यवस्थित करतो. त्यांना १०० टक्के गुडघे टेकायला लावतो”, असा इशारा धंगेकर यांनी दिला आहे.