पुणे : आगामी महापालिका निवडणूक तयारीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभानिहाय निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी महापालिका निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत बैठका आणि संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देण्यात आले आहे. या तयारीमध्ये काँग्रेसने निरीक्षकांची नियुक्ती करून आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी विधानसभानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.

वडगावशेरी मतदारसंघासाठी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर हे निरीक्षक, तर संतोष आरडे सहायक निरीक्षक असतील. शिवाजीनगर मतदारसंघाच्या निरीक्षकाची जबाबदारी माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याकडे असून, राजेंद्र भुतडा त्यांचे सहायक असतील. कोथरूड मतदारसंघासाठी सुनील शिंदे निरीक्षक असून, संदीप मोकाटे सहायक निरीक्षक असणार आहेत.

पर्वती मतदार संघाचे निरीक्षक संजय बालगुडे आणि सहायक निरीक्षक सतीश पवार आहेत. पुणे कँटोन्मेंटची जबाबदारी माजी आमदार दीप्ती चवधरी आणि मेहबूब नदाफ यांच्याकडे, तर कसबा मतदार संघासाठी ॲड. अभय छाजेड आणि दरेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. हडपसर विधानसभा मतदार संघासाठी सुजीत यादव आणि देविदास लोणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व निरीक्षक, सहायक निरिक्षकांनी ब्लॉक अध्यक्षांच्या मदतीने विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष जाऊन बैठका, मेळाव्यांचे आयोजन करावे. तसेच पक्ष संघटनेबाबतच्या सद्य:परिस्थितीचा अहवाल शहर काँग्रेसला सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते. शहरासह जिल्ह्यात काँग्रेसचा सद्य:स्थिती एकही आमदार आणि खासदार नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार की महाविकास आघाडीत राहून लढविणार, याबाबतही संदिग्धता आहे.