पुणे : ‘ज्यांनी इतिहासाला काळिमा फासण्याचा प्रयत्न केला, त्यांची पाठराखण छत्रपतींच्या घराण्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे करत आहेत. देशातील पहिल्या शाळेसंदर्भात उदयनराजे यांनी केलेले विधान हे दुर्दैवी आणि खोडसाळपणाचे आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उदयनराजे भोसले यांंच्यावर टीका केली. महात्मा फुले जयंतीनिमित्त फुलेवाड्यात जाऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना अभिवादन केले. तसेच, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार न केल्याने मृत्युमुखी पडलेल्या तनिषा भिसे यांच्या नातेवाइकांची सपकाळ यांनी भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संजय ठाकरे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.

‘थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या कार्याचे महात्मा फुले यांनी अनुकरण केले होते. त्यांनी देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली होती,’ असे विधान उदयनराजे यांनी केले. याबाबत सपकाळ म्हणाले, ‘देशातील पहिली आणि मुलींची शाळा कोणी सुरू केली, हा इतिहास सर्वश्रुत आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांचे विधान खोडसाळपणाचे आहे. छत्रपतींच्या घराण्यातील लोक इतिहासाला काळिमा फासणाऱ्यांची पाठराखण करत आहेत. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्याबाबत ते काहीच बोलत नाहीत, हे दुर्दैवी आहे.’

‘फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनीच आज पुन्हा डोके वर काढले आहे. आता ‘फुले’ चित्रपटातून इतिहासाची लपवाछपवी केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीचा बळी घेतल्यानंतरही काहींना वाचविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. ‘सावित्रीबाई फुले यांंच्यावर दगड आणि शेण फेकणारे परदेशातून आले नव्हते. महिला शिकली, तर धर्म बुडेल या विचाराच्या लोकांनी त्यांना त्रास दिला. मात्र, ‘फुले’ चित्रपटातून तो भाग वगळावा, असे सेन्साॅर बोर्ड सांगत आहे. ही लपवाछपवी कशाला,’ अशी विचारणाही सपकाळ यांनी केली.

‘एसआयटी’मार्फत चौकशीची मागणी

गर्भवतीच्या मृत्युप्रकरणी राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करावे आणि विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी. निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.