लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विधानाशी असहमत असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रामध्ये पुन्हा एकदा संयुक्त पुरोगामी आघाडीच (यूपीए-३) सत्तेवर येईल, असा आशावाद व्यक्त केला. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नसून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करणे हाच आमचा एककलमी कार्यक्रम असल्याचे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये आलेल्या शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, शहराध्यक्ष अभय छाजेड, आमदार शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, मोहन जोशी या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना ‘इंडिया शायनिंग’ आणि ‘फील गुड’ असे वातावरण असताना २००४ मध्ये काँग्रेस पक्षावर जनतेने विश्वास टाकला. २००९ मध्ये काँग्रेसला अधिक जागांवर विजय मिळाला हे दाखले देत शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या निकालासंदर्भात प्रत्येकाचा अंदाज असतो. जसा पवारांचा अंदाज आहे तसा माझाही अंदाज आहे. त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे विधान पवार यांनी केले असले तरी तसे घडेल असे आपल्याला वाटत नाही. पवार निराश होऊन बोलतात असे वाटत नाही. ते स्पष्टपणाने बोलतात. कदाचित भाजपला गाफील ठेवण्यासाठी त्यांनी असे विधान केले असावे.
गुजरातमधील दंगलीसंदर्भात दहशतवादविरोधी पथकाचे तपासाचे काम सुरू आहे. त्यामुळे दंगलीसंदर्भात नरेंद्र मोदी यांना ‘क्लिन चिट’ दिली असे म्हणता येणार नाही याकडे लक्ष वेधून शिंदे म्हणाले, मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर त्यांनी त्याप्रमाणे वागले पाहिजे. मोदी यांनी राजधर्माचे पालन करावे, असा अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेला सल्ला योग्य आहे.
‘तोपर्यंत दोषी कसे मानणार?’
राष्ट्रकुल युवा स्पर्धेतील गैरव्यवहारांचा ठपका असून तुरुंगामध्ये जावे लागल्यानेच सुरेश कलमाडी यांना उमेदवारी नाकारली का, या प्रश्नाविषयी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, राजकारणात काही वेळा आरोप-प्रत्यारोप होत असतात. न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. यामध्ये पूर्ण निर्णय होत नाही तोपर्यंत कलमाडी दोषी आहेत असे कसे मानणार? अर्थात त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न हा पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारितील निर्णय आहे. त्याविषयी मी काही बोलणे योग्य होणार नाही.
केंद्रात ‘यूपीए-३’च सत्तेवर येईल- सुशीलकुमार शिंदे
निकालासंदर्भात प्रत्येकाचा अंदाज असतो. जसा पवारांचा अंदाज आहे तसा माझाही अंदाज आहे. त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे विधान पवार यांनी केले असले तरी तसे आपल्याला वाटत नाही.
First published on: 04-04-2014 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sushilkumar shinde election