लोकसभेचा मावळ आणि विधानसभेचा चिंचवड मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून शहर काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी श्योराज जीवन वाल्मीकी ‘चाचपणी’ साठी प्रथमच शहरात येत असून त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने काँग्रेसची व्यूहरचना ठरणार असून शक्तिप्रदर्शनही करण्यात येणार आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी सकाळी महिला काँग्रेसने काळेवाडीतील न्यू मोरया मंगल कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर, बचत गटांचे उद्घाटन व महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. महिला व बालकल्याणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,  सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे आदी उपस्थित राहणार आहेत. शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर व महिलाध्यक्षा ज्योती भारती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेविका गीता मंचरकर, माजी नगरसेवक बाबू नायर, निगार बारस्कर आदी उपस्थित होते.
ज्योती भारती म्हणाल्या, कार्यकारिणी झाली असून कामाला सुरुवात झाली आहे. संघटन वाढवणे व महिलांच्या प्रश्नांवर काम करण्यास प्राधान्य राहणार आहे. भोईर म्हणाले, लोकसभा-विधानसभेसाठी सर्व बाजूने तयारी आहे. येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याची आमची तयारी आहे. शहराध्यक्ष, महिला अध्यक्षांना आता ‘स्थिरता’ लाभल्याने जोमाने काम होईल. मुख्यमंत्र्यांनी शहरातील प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक घेतल्याचे भोईर यांनी पत्रकारांना सांगितले.
‘मुख्यमंत्र्यासोबत फोटो काढले नाहीत’
मुख्यमंत्र्यांना शहरातील प्रश्नांची जाण असून सर्वसामान्यांविषयी तळमळ आहे, अनधिकृत बांधकामांविषयी दिलासा देणारा निर्णय ते घेतील, अशी आशा वाटते. आम्ही पुण्यात मुख्यमंत्र्यांना भेटलो व येथील समस्यांचे निवेदन दिले. मात्र, इतरांसारखे फोटो काढून पेपरला दिले नाहीत, ही आमची चूक झाली, अशी सूचक प्रतिक्रया भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली.

Story img Loader