लोकसभेला पुण्याच्या जागेसाठी पक्षात अधिक सक्षम उमेदवार आहेच. त्यातून बाहेरून उमेदवार घेण्याची गरज आम्हाला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले. आगामी निवडणुकीत अधिकच्या जागा मागण्याचा अधिकार काँग्रेसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेसाठी २२ जागा का हव्यात, हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यालाही आहे, असेही ते म्हणाले.
खासदार सुरेश कलमाडी यांच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती व त्यांच्या कौतुकाबाबत ठाकरे यांना छेडले असता, कलमाडी यांचा काँग्रेसशी काही संबंध नाही. व्यक्तिगत संबंधांमुळे त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व त्यांचे कौतुक केले तर काय बिघडले, असे ते म्हणाले. पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी आमच्याकडे अनेक सक्षम उमेदवार असल्याने बाहेरून उमेदवार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून जागावाटपाबाबत २९-१९ अशा फॉम्र्युल्याची मागणी करण्यात आली असल्याच्या मुद्दय़ावर विचारले असता ते म्हणाले की, यापूर्वीप्रमाणेच यंदाच्या जागावाटपाच्या फॉम्र्युल्यालाही काही आधार आहे. २००४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात आली होती. २००९ मध्ये ताकद वाढल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिक जागांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार लोकसभा व विधानसभेसाठी त्यांना जादा जागा सोडल्या गेल्या. त्यामुळे यंदा अधिकच्या जागा मागण्याचा अधिकार काँग्रेसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २२ जागा का हव्यात, हे मलाही जाणून घ्यायचे आहे. लोकसभेनंतर विधानसभेच्या जागेबाबत चर्चा केली जाईल.
नरेंद्र मोदी यांच्याविषयी ते म्हणाले, पंतप्रधानपदासाठी भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले असले, तरी त्याचा महाराष्ट्रात काहीच परिणाम होणार नाही. राज्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही.

‘…तरच दाभोलकर हत्येचा तपास इतर यंत्रणांकडे द्यावा’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाबाबत ते म्हणाले, दाभोलकरांचे मारेकरी तातडीने शोधावेत, ही जनतेची भावना आहे. या प्रकरणी राजकारण किंवा भडक विधाने होऊ नयेत. या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या अटोक्यात असेल, तर ठीक आहे. अन्यथा इतर यंत्रणांकडे तपास देणे योग्य ठरेल. गृहखात्याला तपासाबाबत आशा नसेल, तर गृहविभागाने हा तपास सीबीआयकडे द्यावा.                                    

‘काँग्रेसला पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवावा लागत नाही’

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपने पंतप्रधानपदासाठी जाहीर केल्याबाबत बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले की, भाजपने पंतप्रधानपदासाठी उमेदवार जाहीर केला असला, तरी काँग्रेसला आपला उमेदवार ठरवावा लागत नाही. काँग्रेसमध्ये कायमच नेतृत्व राहिलेले आहे. सध्याही राहुल गांधी हेच पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे उमेदवार ठरविण्याची आम्हाला आवश्यकता नाही. त्यावरून आमच्यात मतभेदही नाहीत.

Story img Loader