लोकसभेला पुण्याच्या जागेसाठी पक्षात अधिक सक्षम उमेदवार आहेच. त्यातून बाहेरून उमेदवार घेण्याची गरज आम्हाला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले. आगामी निवडणुकीत अधिकच्या जागा मागण्याचा अधिकार काँग्रेसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेसाठी २२ जागा का हव्यात, हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यालाही आहे, असेही ते म्हणाले.
खासदार सुरेश कलमाडी यांच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती व त्यांच्या कौतुकाबाबत ठाकरे यांना छेडले असता, कलमाडी यांचा काँग्रेसशी काही संबंध नाही. व्यक्तिगत संबंधांमुळे त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व त्यांचे कौतुक केले तर काय बिघडले, असे ते म्हणाले. पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी आमच्याकडे अनेक सक्षम उमेदवार असल्याने बाहेरून उमेदवार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून जागावाटपाबाबत २९-१९ अशा फॉम्र्युल्याची मागणी करण्यात आली असल्याच्या मुद्दय़ावर विचारले असता ते म्हणाले की, यापूर्वीप्रमाणेच यंदाच्या जागावाटपाच्या फॉम्र्युल्यालाही काही आधार आहे. २००४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात आली होती. २००९ मध्ये ताकद वाढल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिक जागांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार लोकसभा व विधानसभेसाठी त्यांना जादा जागा सोडल्या गेल्या. त्यामुळे यंदा अधिकच्या जागा मागण्याचा अधिकार काँग्रेसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २२ जागा का हव्यात, हे मलाही जाणून घ्यायचे आहे. लोकसभेनंतर विधानसभेच्या जागेबाबत चर्चा केली जाईल.
नरेंद्र मोदी यांच्याविषयी ते म्हणाले, पंतप्रधानपदासाठी भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले असले, तरी त्याचा महाराष्ट्रात काहीच परिणाम होणार नाही. राज्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा