प्रभाग क्रमांक ४० (अ) मधील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांनी मनसेसह महायुती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत मनसेकडील जागा सोमवारी काँग्रेसला मिळवून दिली. घोडके यांनी मनसेच्या इंदुमती फुलावरे यांचा ४४९ मतांनी पराभव केला. या विजयामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेता हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
या पोटनिवडणुकीसाठी रविवारी ४२.८८ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. एकूण मतदान १० हजार २१८ एवढे होते. काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांना ४३४२ मनसेच्या इंदुमती फुलावरे यांना ३८९३, महायुतीतर्फे लढलेल्या भाजपच्या संध्या बरके यांना १२१६, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलम लालबिगे यांना ७६७ मते मिळाली. निवडणुकीत सत्ताधारी तसेच महायुतीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. निकाल जाहीर होताच काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, सदानंद शेट्टी आदींनी घोडके यांचे अभिनंदन केले, तर कार्यकर्त्यांनी या सर्वाना पुष्पहार घालून पेढे भरवले.
महापालिकेतील विरोधी पक्षनेता पद काँग्रेसकडे राहणार का ते मनसेला मिळणार, याचा निर्णय या निवडणुकीवर अवलंबून होता. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. महापालिकेत या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या प्रत्येकी २८ इतकी आहे. काँग्रेसची सदस्यसंख्या आता २९ झाल्यामुळे अरविंद शिंदे या पदावर कायम राहतील, हे सोमवारी स्पष्ट झाले.
... आणि अनामत घालवून बसले – शिंदे
मतदारांनी योग्य तो न्याय दिला आहे. काँग्रेसने ही निवडणूक लादली असा जो खोटा प्रचार करण्यात आला तो करणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखवली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी विजयानंतर व्यक्त केली. आघाडीचा धर्म म्हणणाऱ्या राष्ट्रवादीने स्वत:चा उमेदवार उभा करून आघाडीचा धर्म पाळला नाही, खुद्द अजितदादांचीही दिशाभूल केली आणि आता स्वत:ची अनामतही घालवून बसले. आघाडीचा धर्म न पाळणाऱ्या त्या पक्षाबरोबर आघाडी म्हणून महापालिका सभागृहात आता कसे काम करायचे याचा निर्णय आम्हाला करावा लागेल, असेही शिंदे म्हणाले.
प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या घोडके विजयी
प्रभाग क्रमांक ४० (अ) मधील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांनी मनसेसह महायुती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत मनसेकडील जागा सोमवारी काँग्रेसला मिळवून दिली.
First published on: 09-07-2013 at 02:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress win in by election in pune