उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लष्कराने बोपखेल व पिंपळे सौदागर येथील नेहमीचे वाहतुकीचे रस्ते बंद केले असले, तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शक्य त्या पर्यायी मार्गाचा विचार करू, असे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी दिले.
भाजपचे खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली बोपखेलचे नगरसेवक संजय काटे, पिंपळे सौदागरचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, अण्णा शेलार आदींचा समावेश असलेले शिष्टमंडळ दिल्लीत पर्रीकरांना भेटले. या वेळी झालेल्या चर्चेत दोन्हीकडील नगरसेवकांनी रस्ता बंद झाल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय पर्रीकरांच्या निदर्शनास आणून दिली. लष्कराकडून होत असलेल्या असहकार्याची सविस्तर माहितीही त्यांना देण्यात आली. या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती खासदार साबळेंनी केली. या वेळी पर्रीकर म्हणाले, बोपखेल रस्त्याचा संरक्षण विभागाचा अहवाल प्राप्त झाला असून योग्य निर्णय होईल. पिंपळे सौदागरच्या रस्त्यासाठी पर्यायाचा निश्चित विचार करू. दोन्ही रस्त्यांच्या बाबतीत प्रकरणे न्यायालयात गेली, तेथे न्यायालयाने रस्ता बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कारवाई करावी लागली. पुढील महिन्यात पुण्याचा दौरा आहे. त्या वेळी या विषयावर सर्व संबंधितांशी पुन्हा चर्चा करू.
‘बोपखेल व पिंपळे सौदागरमध्ये पर्यायी रस्त्यांचा विचार करू’
पुढील महिन्यात पुण्याचा दौरा आहे. त्या वेळी या विषयावर सर्व संबंधितांशी पुन्हा चर्चा करू
First published on: 28-10-2015 at 03:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consider alternative roads in bopakhela and pimple saudagar