पुणे : पुण्यातील दापोडी परिसरातून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात निष्पन्न झाले आहे. शनिवारी (२० ऑगस्ट) एटीएसकडून संशयित दहशतवाद्यांच्या विरोधात न्यायालयात दोन हजार पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने जुनैद मोहम्मद याला दापोडी परिसरातून अटक केली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार जुनैद, त्याचे साथीदार इनामूल हक, युसूफ आणि आफताब हुसेन शाह यांना अटक करण्यात आली होती. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर युसूफ आणि आफताब शाह यांना जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आली होती. इनामूल हकला उत्तरप्रदेशातील सहारनपूरमधून अटक करण्यात आली होती.

दहावी अनुत्तीर्ण असलेला जुनैद मूळचा बुलढाण्याचा आहे. समाजमाध्यमातून तो जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात तो घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून चौघा संशयित दहशतवाद्यांच्या विराेधात शनिवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती एटीएसकडून देण्यात आली.

Story img Loader