लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या गैरसमजुतीतून मैत्रिणीमार्फत भागीदाराच्या खुनाचा कट रचणाऱ्या सनदी लेखापालाला दरोडाविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन गावठी पिस्तुले, ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
विवेक नंदकिशोर लाहोटी ( वय ४२, रा. शाहूनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या सनदी लेखापालाचे नाव आहे. त्याच्या मैत्रिणीलाही अटक केली आहे. लाहोटी याने व्यावसायिक भागीदार राजू माळी (रा. सोमाटणे फाटा, मावळ) याच्या खुनाचा कट रचला होता.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारांसाठी शोधाशोध
किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेल्या खुनाच्या कटाचा तपास सुरू असताना पोलिसांनी सुधीर अनिल परदेशी याला गावठी पिस्तुलासह अटक केली होती. आरोपी सुधीर याने त्याचा साथीदार शरद साळवी याच्यामार्फत मध्यप्रदेशातून तीन गावठी पिस्तुले आणि काडतुसे आणली होती. त्यातील एक पिस्तूल आणि २४ काडतुसे सनदी लेखापाल लाहोटी याने स्वतःकडे ठेवली. लाहोटीने सराईत गुन्हेगार सुधीर परदेशी, शरद साळवी यांना ५० लाख रुपयांची राजू साळवे याच्या खुनाची सुपारी दिली होती. लाहोटी याने व्यवहारातील गैरसमजुतीतून जवळच्या मैत्रिणीमार्फत आरोपी सुधीर याला भागीदार माळी याच्या खुनाची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले. राजू माळी हे शनिवार, रविवारी सातारा येथे जात असल्याने आरोपींनी तिथे जाऊन रेकी केली होती. तिथेच खुनाचा कट अमलात आणण्याचे निश्चित केले होते.