लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या २२/२६ या जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे त्या घोषणेला काही अर्थ नाही. दोन्ही पक्षांच्या चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचा जागावाटपाचा दावा फेटाळून लावला.
राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यक्रमासाठी ठाकरे मंगळवारी पुण्यात आले होते. या वेळी पत्रकार परिषदेत जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या घोषणेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की दोन्ही पक्षांमध्ये अद्याप जागावाटप तसेच जागांची अदलाबदल करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. ही चर्चा १९ ऑगस्टनंतर होईल. जागांबाबत अद्याप चर्चाही नाही समन्वय समितीत त्याबाबत चर्चा होईल. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
‘अन्नसुरक्षा हा काँग्रेसचा निर्णय’
अन्नसुरक्षा विधेयक हा केंद्रातील आघाडी सरकारचा निर्णय नाही, तर हा काँग्रेसचा निर्णय आहे. जाहीरनाम्यातील आश्वासनाच्या पूर्ततेसाठी काँग्रेसने हा निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले, असाही दावा ठाकरे यांनी या वेळी केला. ते म्हणाले, की सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये स्वस्त दरात अन्नधान्य पुरवण्याचे आश्वासन काँग्रेसने जनतेला दिले होते. त्याचीच पूर्तता आता होत आहे. त्यामुळे त्याचे श्रेय कोणी घ्यायचे हा प्रश्नच नाही.
या विधेयकाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, की तो केवळ गैरसमज आहे. सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारला शेतकऱ्यांनाही मजबूत करायचे आहे तसेच गरजूंनाही अन्नधान्याचा पुरवठा करायचा आहे. सरकार बाजारभावाप्रमाणेच अन्नधान्य खरेदी करून ते गरजूंना देणार आहे.
‘कामगारांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील’
कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस नेहमीच संवेदनशील राहिली आहे आणि सरकारने या समस्या सोडवाव्यात यासाठीही काँग्रेस प्रयत्नशील राहील, असे आश्वासन माणिकराव ठाकरे यांनी कामगार मेळाव्यात बोलताना दिले. राष्ट्रीय मजदूर संघाच्या तेराव्या वर्धापनदिन मेळाव्यात ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी आमदार बाला बच्चन, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा कमल व्यवहारे, तसेच आमदार रमेश बागवे, सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायकराव देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

Story img Loader