पुणे : हिंजवडीच्या माहिती तंत्रज्ञान केंद्राला (आयटी हब) शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका तीन प्रकल्पाच्या कामाने वेग पकडला आहे. या मेट्रोच्या कामाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा सोमवारी सकाळी गाठण्यात आला. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठीच्या २ हजार सेगमेंटची उभारणी आज पूर्ण करण्यात आली आहे.
पुणे मेट्रो मार्गिका तीनवर २३ जुलै २०२२ रोजी पहिला सेगमेंट हिंजवडी येथे उभारण्यात आला होता. त्यानंतर नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल दोन हजार सेगमेंट विकसकांनी उभे केले आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो मार्गिका तीनचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे.
हेही वाचा >>> अंशदान घेऊन पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण?, राज्य सरकारकडून लवकरच घोषणा
याबाबत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर म्हणाले, की हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान व स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम सुरू आहे. केवळ नऊ महिन्यांत दोन हजार सेगमेंटची आणि काम सुरू झाल्यापासून वर्षभरातच एकूण खांब उभारणीपैकी ५० टक्के खांब उभारणी पूर्ण करण्याचा टप्पा गाठण्यात आम्हाला यश मिळाले आहे.
हेही वाचा >>> पाणीकपात की पळवाट?, कालवा सल्लागार समितीची उद्या बैठक; उपलब्ध पाण्याचे नियोजन
फडणवीसांना पाहणीचे निमंत्रण
या कामाच्या अनुषंगाने पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पुणे मेट्रो मार्गिका तीनबाबत विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच या कामाच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो अतिशय महत्त्वाची असून फडणवीस यांनी या मार्गाला भेट देण्यासाठी आणि प्रगती पाहण्यासाठी पुण्यात यावे, असे निमंत्रण पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या वतीने या बैठकीत देण्यात आले.
हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर मेट्रोने प्रवास करताना नागरिकांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी आम्ही काम करत आहोत. विशेषत: मेट्रो स्थानकांचे तसेच ट्रेनच्या अंतर्गत रचनेचे आरेखन करताना आम्ही प्रवासीकेंद्रित मानसिकतेचा अभ्यास करून रचना बनवत आहोत.