‘औंध चेस्ट हॉस्पिटल’ येथे कर्करोगासाठीचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा निर्णय झाला असून येत्या काही वर्षांतच त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी- चिंचवडचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली आहे.
‘ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्तनांच्या कर्करोविषयीच्या राष्ट्रीय परिषदेचे शुक्रवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां शोभना रानडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, किमी काटकर, डॉ. एम. के. महाजन, डॉ. जे. के. सिंग, डॉ. संजय शर्मा, डॉ. अनंतभूषण रानडे या वेळी उपस्थित होते.
परदेशी म्हणाले, ‘‘कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने होणारी वाढ पाहता संसर्गजन्य रोगांप्रमाणेच कर्करोगाचीही साथ आली आहे की काय असे म्हणावेसे वाटते. देशात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत चौपट आहे. स्तनांच्या कर्करोगाचे निदान लवकर व्हावे यासाठी जाणीवजागृती करणे आवश्यक आहे. पिंपरी- चिंचवडमधील १५४ शाळांमधील शिक्षिका याबाबत पुढाकार घेतील.’’ गरीब वस्त्यांतील महिलांचे कर्करोगाचे निदान करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  
डॉ. सिंग यांनी लिहिलेल्या ‘ब्रेस्ट कॅन्सर मॅनेजमेंट- व्हिजन २०१३’ या पुस्तकाचे या वेळी परदेशी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर, रुग्णांची विशेष आत्मीयतेने सेवा करणाऱ्या परिचारिका विजया उभे यांचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader