पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. आयुक्तालयातील मुख्य इमारत वगळता अन्य विभागांची बैठी कार्यालये पाडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन वर्षांत सात मजली अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्यालयातील गु्न्हे शाखेतील विभागांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले होते. शहराचा विस्तार वाढत असताना पुणे पोलीस आयुक्तालयाची इमारत आधुनिक स्वरुपात बांधण्यात यावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन इमारत पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करू, असे आश्वासन दिले होते. पवार यांनी नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

‘लँडमार्क डिझाइन ग्रुप’ या कंपनीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्यालायाच्या आवारातील बैठी कार्यालये पाडण्याचे काम पूर्ण झाले असून, मुख्य इमारत अद्याप पाडण्यात आली नाही. पोलीस आयुक्यालयाच्या मुख्य इमारतीचे खासगी जागेत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता लागणार आहे. मासिक भाडे, तसेच नवीन इमारतीत पोलीस आयुक्यालयाचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर तेथे फर्निचर, रंगरंगोटीची कामे केली जाणार आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. मुख्य इमारतीचे स्थलांतर केल्याशिवाय नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचविले आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुख्य इमारत पाडण्यात यावी, असा प्रस्ताव पोलिसांनी मांडला आहे. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

पोलीस आयुक्यालायाच्या नवीन इमारतीचे बांधकाम येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. आयुक्यालयातील मुख्य इमारतीतील कार्यालये अन्यत्र स्थलांतरित केली जाणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

अत्याधुनिक इमारतीत काय ?

पुणे पोलीस आयुक्यालयाची प्रस्तावित इमारत अत्याधुनिक असणार आहे. तीन विभागांत (ब्लाॅक) इमारत बांधण्यात येणार आहे. तीन ‘ब्लाॅक’ एकमेकांशी जाेडले जाणार आहेत. पुणे पाेलीस आयुक्यालयातील सध्याची जागा १२ हजार ५३१चौरस मीटर आहे. नवीन इमारत बांधल्यानंतर २९ हजार ८५३ चौरस मीटर जागा वापरासाठी उपलब्ध होईल. एकूण सात मजली इमारतीत अत्याधुनिक सुविधा, यंत्रणा असणार आहे. वाहनांसाठी दुमजली पार्किग असणार आहे.

Story img Loader