मजुरांच्या स्थलांतराची शक्यता, बांधकाम साहित्याच्या उपलब्धतेचा अभाव; क्रेडाई पुणे मेट्रोचे सर्वेक्षण

पुणे : करोना विषाणूच्या संकटामुळे मजुरांच्या स्थलांतराची शक्यता, बांधकाम साहित्याच्या उपलब्धतेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांना प्रकल्प स्थळी जाण्यासाठी येत असलेले अडथळे यामुळे परवानगी असूनही बांधकाम प्रकल्पांवर काम सुरू होण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे निष्कर्ष क्रेडाई पुणे मेट्रोने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहेत.

प्रशासनाने संबंधित सर्व विभागांशी एकत्रित चर्चा करून सर्वसमावेशक निर्णय घेण्याची मागणी क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे करण्यात आली आहे.

बांधकाम क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेत सरकारने काही अटी आणि शर्ती घालून बांधकाम प्रकल्पांवर काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पण, प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास र्मचट यांनी दिली. या सर्वेक्षणामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) भागातील तब्बल २१६ व्यवसायिकांनी भाग घेत आपल्या अडचणी नोंदविल्या.

र्मचट म्हणाले,  सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात थांबावे की नाही या विवंचनेमध्ये असलेले मजूर आपल्या गावी गेले तर बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसेल. त्यामुळे सरकारने तातडीची पावले उचलत या सर्व मजुरांना आश्वस्त करणे गरजेचे आहे.

बांधकाम क्षेत्रापुढील आव्हाने

* मजुरांच्या संख्येपैकी ४६ टक्के घरी परतण्याच्या तयारीत आहेत.

* टाळेबंदीतील नियमांमुळे २० टक्क्य़ांपेक्षा कमी कर्मचारी हे प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचू शकले.

* प्रकल्प सुरू करण्यासाठी ९० टक्के विकसकांना प्रकल्पाच्या ठिकाणी साहित्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे.

* निम्म्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्प स्थळांवर शंभरपेक्षा कमी मजूर उपलब्ध आहेत.

*  स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून मिळालेल्या आदेशांमध्ये समन्वय  नसल्याने विकसक गोंधळात

* पेट्रोलची उपलब्धता नसल्याने कर्मचाऱ्यांना प्रकल्पाच्या ठिकाणी येणे  शक्य होत नाही.

* बँकांनी पतपुरवठा करणे थांबविल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

Story img Loader