लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : शहरातील १८ मीटर आणि त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांवर, पदपथावर सद्य:स्थितीत महापालिकेची स्थापत्यविषयक कामे सुरू असल्याने अशा रस्त्यांवर यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे आठही क्षेत्रीय कार्यालयांतील रस्त्यांची पाहणी करण्यात येत आहे. चार क्षेत्रीय कार्यालयातील रस्त्यांची पाहणी पूर्ण झाली आहे. आठही कार्यालयांतील रस्त्यांची पाहणी झाल्यानंतर फेरआढावा घेऊन बदल केले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील १८ मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफ केले जातात. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. फेब्रुवारी २०२४ पासून यांत्रिकी पद्धतीने चार विभागांत काम सुरू असून, त्यासाठी चार संस्था कार्यरत आहेत. प्रत्येक विभागात दोन मोठी, दोन मध्यम रस्तेसफाई वाहने, दोन हायवा, एक पाण्याचा टँकर अशा वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचे संचलन करण्यासाठी प्रत्येक विभागात ३२ सफाई कर्मचारी, नऊ वाहनचालक, दहा ऑपरेटर, चार मदतनीस अशा ५५ कामगारांद्वारे कामकाज करणे अपेक्षित आहे. प्रत्येक रस्तेसफाई वाहनाद्वारे दररोज ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त

शहरातील १८ मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते, बीआरटीएस, महामार्गावरील पदपथ आणि सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंची आठवड्यातून तीन वेळा, मुख्य मार्गावरील मधल्या रस्त्याची, रस्त्याच्या कडेच्या भिंतीच्या परिसराची आठवड्यातून एकदा साफसफाई करणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील विविध रस्त्यांवर स्थापत्यविषयक आणि पदपथ विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.

दोन प्रमुख रस्त्यांची दररोज साफसफाई

शहरातील १८ मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने दिवसाआड, तीन दिवसांनी, आठ दिवसांनी साफसफाई केली जाते. जास्त वर्दळ असलेल्या पुणे-मुंबई महामार्ग आणि औंध-रावेत या मार्गावर सद्य:स्थितीत दिवसाआड साफसफाई केली जात आहे. मात्र, या मार्गांवर वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे टायरमधून माती, धूळ जास्त प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांवर आता दररोज यांत्रिकी पद्धतीने सफाई केली जाणार आहे.

आणखी वाचा-शहरात चोरट्यांचा उच्छाद; शिवाजी रस्ता, बिबवेवाडीत पादचाऱ्यांची लूट

रस्ते, पदपथांवर स्थापत्य विभागाच्या वतीने विकासकामे सुरू असल्याने साफसफाई करताना अडचणी येत आहे. त्यामुळे आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्त्यांचा फेरआढावा घेण्यात येत आहे. आत्तापर्यंत चार क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्त्यांचा आढावा पूर्ण झाला असून, रस्तेसफाईसाठी काही बदल करण्यात आले आहेत. ज्या रस्त्यांवर अधिकृतपणे वाहनतळाची व्यवस्था आहे, असे रस्ते पहाटेच साफ करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction work obstacle for mechanical road cleaning in pune municipal corporation pune print news ggy 03 mrj