पुणे : जेसीबी यंत्राच्या लोखंडी बकेटखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना धनकवडी भागात घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. राहुल भुरेलाल जाधव (वय १८) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जेसीबी यंत्रचालक मुकेश यादव (वय २७, सध्या रा. अष्टद्वार सोसायटी, धनकवडी) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

धनकवडीतील अष्टद्वार सोसायटी परिसरात बांधकाम सुरू आहे. गेल्या महिन्यात तेथे काम करताना मजूर राहुल जाधव जेसीबी यंत्राच्या खाली झोपला होता. जाधव यंत्राजवळ झोपल्याचे जेसीबी यंत्रचालक यादव याच्या लक्षात आले नाही. त्याने यंत्र सुरू केले. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या राडारोडा उचलण्यासाठी असलेली यंत्रातील लोखंडी बकेट त्याने वर उचलली आणि त्याने पुन्हा खाली आणली. लोखंडी बकेट जाधवच्या पोटावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातानंतर चौकशी केली. तेव्हा जेसीबी यंत्रचालक यादवच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार धोत्रे तपास करत आहेत.