कुस्तीगीर महिला खेळाडूंच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. पुण्यात २ जून रोजी बांधकाम कामगारांनीही रस्त्यावर उतरून या महिला खेळाडूंना पाठिंबा दर्शवला. नव समाजवादी पर्याय व ‘श्रमिक हक्क आंदोलन’ या नोंदणीकृत ट्रेड युनियन तर्फे बालगंधर्व चौकात ही निदर्शने करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलकांनी मोदी सरकारवर बलात्कारी व लैंगिक गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा आरोप करत निषेध केला. संघटनेचे सरचिटणीस सागर सविता धनराज म्हणाले, “आजपर्यंत भाजपाने अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना ईडी, सीबीआय चौकशांपासून अभय दिले. मात्र आता या शासनाचा निर्ढावलेपणा एवढा वाढला आहे की, बलात्कारी व लैंगिक गुन्हेगारांनाही ते आता खुलेआम पाठीशी घालत आहेत.” त्यांनी बिल्कीस बानो, उन्नाव, हाथरस प्रकरणाचे संदर्भही आपल्या भाषणात दिले.

“पदक विजेत्या महिला खेळाडू सरक्षित नसतील तर इतरांचं काय?”

“जर देशासाठी पदक मिळवणाऱ्या महिला खेळाडूही सुरक्षित नसतील, तर कामावर जाणाऱ्या महिला, त्यांच्या लेकी कशा सुरक्षित राहणार?” असा सवाल यलम्मा गुल्लाशेठ यांनी उपस्थित केला. तसेच गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्याबद्दल चीड व्यक्त केली.

सरकारचा निषेध करत घोषणाबाजी

‘शरम करो, शरम करो, सत्तेसाठी बलात्कारी, लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध’, ‘विनेश, साक्षी, बजरंग तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘लडेंगे, जितेंगे’ या आशयाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसेच कामगार-कार्यकर्त्यांनी भाषणं करत या प्रकरणाचे गांभीर्य नागरिकांपर्यंत पोहोचले. यावेळी विविध समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येऊन कामगारांचा उत्साह वाढवला.

हेही वाचा : कुस्तीगीरांची सरकारला पाच दिवसांची मुदत; किसान संघटनेच्या मध्यस्थीनंतर पदकांच्या ‘विसर्जना’चा निर्णय मागे

याप्रसंगी संघटनेचे मकरंद पवार, निहरिका भोसले, श्रावणी बुआ, केतकी माळवदे, मलम्मा कांबळे, अशोक राठोड, बालाजी झुकझुके, महेंद्र रणवीर, अखलाक खान, रवी पवार, ताऱ्या राठोड, हनुमंत चव्हाण, अंगुर खतरावत असे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction workers protest in support of women wrestler in pune pbs
Show comments