गेल्या वर्षी जून महिन्यात उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या ठिकाणी ढगफुटी झाली असताना त्या ठिकाणी जाण्यास इतर मार्ग असल्याचे सांगत नागरिकांना यात्रेला नेले. मात्र, त्या ठिकाणी गेल्यावर निम्म्यातूनच परत आणल्यामुळे यात्रेसाठी घेतलेली रक्कम परत न देणाऱ्या मे जयश्री टूर्स ला ग्राहक मंचाने फटकारले आहे. या ट्रॅव्हल्स कंपनीला पर्यटनाचा अनेक वर्षांचा अनुभव असून तेथील अडचणींची पूर्ण माहिती असतानाही पर्यटकांना घेऊन जात भयावह परिस्थितीला सामोरे जाण्यास भाग पाडले, असे निरीक्षण नोंदवत मंचाने जयश्री टूर्सला पर्यटकांकडून घेतलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.
भारत देविदास येरमाळकर आणि सविता भारत येरमाळकर (रा. शांतीविहार अपार्टमेन्ट, बावधन खुर्द) यांनी याबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार दिली होती. त्यावरून मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात यांनी मे जयश्री टूर्स यांनी ग्राहकाकडून घेतलेले ९५ हजार दोनशे रुपये आणि मानसिक व शारीरिक भरपाई म्हणून पाच हजार आणि तक्रारीचा खर्च दोन हजार रुपये देण्याचा आदेश दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येरमाळकर दाम्पत्य यांना जून २०१३ मध्ये चारधाम यात्रा करावयाची होती. त्यानुसार त्यांनी १८ ते २९ जून दरम्यान जयश्री टूर्सकडे प्रत्येकी ३६ हजार प्रमाणे ७२ हजार रुपयांना धनादेश दिला होता. या यात्रेत एकूण चौदा व्यक्ती सहभागी झालय़ा होत्या. त्याचबरोबर केदारनाथची यात्रा करण्यासाठी तक्रारदारांनी हेलिकॉप्टरसाठी २१ हजार रुपये अतिरिक्त दिले होते. मात्र, चारधाम यात्रेच्या ठिकाणी ढगफुटी व प्रचंड पाऊस झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे ग्राहकांनी जयश्री टूर्स यांना ही सहल रद्द करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी ग्राहकांसह अन्य मार्गाने यात्रा पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. पुणे व दिल्ली विमानतळावर येणाऱ्या बातम्या पाहून पुन्हा-पुन्हा यात्रा रद्द करण्याबाबत विनंती केली. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. हरिद्वार येथे मुक्कामाला पोहोचले, नंतर जयश्री टूर्सच्या सहल व्यवस्थापकांनी चारधाम यात्रा बंद असल्याचे सांगून जवळची पर्यटन स्थळे पाहण्यास सांगितले. दोन दिवसांनी त्यांना परत दिल्ली आणि नंतर पुण्यात परत घेऊन आले.
यात्रा न पूर्ण केल्यामुळे ग्राहकांनी ट्रॅव्हल्स कंपनीकडे सहल आणि विमानाचा खर्च वजा करून इतर रक्कम परत देण्याची विनंती केली. कंपनीने त्यांची मागणी फेटाळल्यामुळे तक्रारदार यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला. मंचाने जयश्री टूर्स यांनी ग्राहकांना सदोष सेवा दिल्याचे सिद्ध होत असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी तक्रारदारांना अन्य मार्गाने यात्रा पूर्ण करण्याचे खोटे आणि फसवे आश्वासन दिले. कारण, अन्य मार्ग असते तर त्या ठिकाणी अडकून पडलेल्या त्या मार्गाने सोडविण्याचे काम प्रशासनाने केले असते, असे आदेशात म्हटले आहे.
ढगफुटी झालेली असतानाही चारधाम यात्रेला नेणाऱ्या जयश्री टूर्सला ग्राहक मंचाने फटकारले
या ट्रॅव्हल्स कंपनीला पर्यटनाचा अनेक वर्षांचा अनुभव असून तेथील अडचणींची पूर्ण माहिती असतानाही पर्यटकांना घेऊन जात भयावह परिस्थितीला सामोरे जाण्यास भाग पाडले.
First published on: 17-07-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consumer court jayashri tour fine