अभियंता महिलेकडून पैसे घेऊन नोकरीसाठी विविध कंपन्यांच्या मुलाखतींचे निमंत्रण देण्याचे आश्वासन दिल्यानंतर या आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या एडज इंडिया लिमिटेड (नोकरी डॉट कॉम) या कंपनीला ग्राहक मंचाने फटकारले आहे. या प्रकरणी कंपनीने सदोष सेवा दिल्याचा ठपका ग्राहक मंचाने ठेवला आहे. भरलेली रक्कम आणि नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये अशी रक्कम अभियंता महिलेला परत करावी असा आदेश कंपनीला देण्यात आला आहे.
याबाबत समिधा पाटील (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी इन्फो एडज इंडिया लिमिटेडचे कायदा विभागाचे व्यवस्थापक आदित्य गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दिली होती. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य मोहन पाटणकर, क्षितिजा कुलकर्णी यांनी आदेश देताना पाटील यांनी भरलेले २,८२५ आणि नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये त्यांना द्यावेत असे म्हटले आहे. पाटील या अभियंता आहेत. त्या करत असलेली नोकरी सोडून त्यांना राहात असलेल्या भागात नोकरी हवी होती. त्यामुळे त्यांनी इन्फो एडज इंडिया लिमिटेड यांच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. त्या वेळी त्यांना भेटण्यास बोलावण्यात आले. कंपनीने त्यांची सर्व माहिती घेतली आणि त्यांना नोकरी मिळण्याची हमी दिली. मात्र, ज्या कंपनीत मुलाखत होईल त्या मुलाखतीत उत्तीर्ण होण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील, असेही त्यांना सांगण्यात आले होते.
ही माहिती कंपनीने दिल्यानंतर पाटील यांनी एडज इंडिया लिमिटेड यांच्याकडे नोंदणी करून २,८२५ रुपये शुल्क भरले. त्या वेळी त्यांना घराजवळील नोकरी मिळेल, तसेच चांगला पगार मिळेल आणि दोन ते तीन आठवडय़ात मुलाखतीसाठी निमंत्रण येईल, असे ठामपणे सांगण्यात आले. बराच कालावधी झाला तरी पाटील यांना एकाही कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी एडज इंडिया लिमिटेडच्या कार्यालयात संपर्क साधून तक्रार केली. पण, त्यांच्या तक्रारीकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. पाटील यांनी पाठविलेल्या ई-मेललाही प्रतिसाद दिला गेला नाही. त्यामुळे त्यांनी भरलेली रक्कम परत मिळावी म्हणून पुन्हा ई-मेल केला. तीन महिने पाठपुरावा केल्यानंतरही त्यांना रक्कम परत देण्यात आली नाही. म्हणून शेवटी त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली.
ही तक्रार आल्यानंतर एडज इंडिया लिमिटेड (नोकरी डॉट कॉम) यांना मंचाने नोटीस बजावली. पण, बाजू मांडण्यासाठी कंपनीकडून कोणीही मंचासमोर हजर राहिले नाहीत. तक्रारदारांनी मंचासमोर सादर केलेल्या कागदपत्रावरून एडज इंडिया लिमिटेड यांनी सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिद्ध होत आहे. कंपनीने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिलेले नसले तरी नोकरी मिळण्यासाठी आवश्यक मुलाखतींची माहिती देण्याचे आश्वासन तक्रारदार यांना दिले होते. ज्या सेवेसाठी कंपनीने शुल्क घेतले, ती सेवा दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी भरलेले शुल्क आणि नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र असल्याचे मंचाने आदेशात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा