खटला चालवण्यासाठी पक्षकाराकडून वकील फी घेऊन नंतर खटला न चालविता त्याला सदोष सेवा दिल्याबद्दल ग्राहक मंचाने एका वकिलाला चांगलाच दणका दिला. वकिलाने फी म्हणून घेतलेले वीस हजार रुपये परत करण्याबरोबरच तक्रारी खर्च म्हणून पक्षकाराला आणखी पाच हजार रुपये देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.
याबाबत गणेश बाबुराव क्षीरसागर (रा. बांदल मळा, किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) यांनी ग्राहक मंचाकडे मे २०११ मध्ये तक्रार केली होती. त्यावरून अॅड. हनमंत तो. करजगीकर (रा. अवधूत अपार्टमेन्ट, रा. वडगाव शेरी) यांनी क्षीरसागर यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य एस. के. पाचरणे यांनी दिला.
क्षीरसागर यांच्या बीड जिल्ह्य़ातील मिळकतीचा वाद सुरू आहे. या मिळकतीच्या वादासंबंधी अॅड. करजगीकर यांनी खटला लढविण्याची क्षीरसागर यांनी विनंती केली. त्यानुसार दोघांमध्ये खटला लढविण्यासंदर्भात करार झाला आणि अॅड. करजगीकर यांना वकील फी म्हणून २५ हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांनी गेवराई न्यायालयात या खटल्यात वकीलपत्र दाखल केले. पण, पुढे खटल्याचे कोणतेही कामकाज केले नाही. दरम्यानच्या काळात क्षीरसागर यांच्या नातेवाइकांनी वाद सुरू असलेली मिळकत परस्पर विकून टाकली. अॅड. करजगीकर यांनी वकील फी घेऊन कोणतेच काम केले नसल्याचे क्षीरसागर यांना समजले. तसेच, अॅड. करजगीकर यांनी घेतलेली वकील फी परत दिली नाही, म्हणून क्षीरसागर यांनी ग्राहक मंच पुणे येथे त्याच्याविरुद्ध दावा दाखल करून दिलेली वकील फी आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी मंचाकडे केली.
या प्रकरणी अॅड. करजगीकर यांच्या वकिलांनी मंचापुढे लेखी म्हणणे मांडून तक्रारीतील मजकूर नाकारला. तक्रारदार व त्यांच्यात कोणताच करार झाला नसल्याचे सांगितले. मात्र, वकील फी म्हणून २५ हजार रुपये घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार न्यायालयात वकील पत्र दाखल केले होते. मात्र, तक्रारदारांनी शिवीगाळ करून ही रक्कम शिवाजीनगर न्यायालयात परत घेतली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे तक्रारदारानी केलेला दावा फेटाळण्यात यावा, अशी मागणी अॅड. करजगीकर यांच्या वकिलांनी केली.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि कागदपत्रे पाहिल्यानंतर क्षीरसागर आणि अॅड. करजगीकर यांच्यात वकील-पक्षकाराचे नाते आहे. तसेच, अॅड. करजगीकर यांनी सदोष सेवा दिल्याचे दिसून येते, असे निकालात म्हटले आहे. तक्रारदारांनी दोघांमध्ये झालेला मूळ करार मंचापुढे सादर केला आहे. या करारात वीस हजार रुपये घेतल्याचे मान्य केले आहे. अॅड. करजगीकर हे तक्रारदाराला पैसे दिल्याचे सांगत असले तरी त्यांनी याबाबतचे कोणतेही पुरावे मंचापुढे दिलेले नाहीत. अॅड. करजगीकर यांनी सेवेत त्रुटी निर्माण केलेली असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे अॅड. करजगीकर यांनी क्षीरसागर यांना वकील फी म्हणून घेतलेले वीस हजार आणि मानसिक, शारीरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडय़ाच्या आत द्यावे, असे आदेशात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा