करारनाम्यात ठरवून दिलेल्या मुदतीत सदनिकेचा ताबा न दिल्याच्या कारणावरून ग्राहक तक्रार निवारण मंचाने बांधकाम व्यावसायिकाला दोषी धरले असून, ग्राहकाने भरलेल्या एकूण रकमेवर ९ टक्के दराने व्याज, तसेच नुकसानभरपाई म्हणून दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. ईशा वास्तू कन्स्ट्रक्शन या बांधकाम संस्थेचे भागीदार देवन जयसुखलाल शहा, भरत मिठालाल नागोरी व इतरांविरुद्ध हा आदेश देण्यात आला आहे.
अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष अंजली देशमुख आणि सदस्य एस. के. पाचारणे यांनी गेल्याच आठवडय़ात हे आदेश दिले आहेत. याबाबत महादेव रामचंद्र भोसले यांनी तक्रार दिली होती. भोसले यांनी धायरी येथील ईशा वास्तू कन्स्ट्रक्शन यांच्या ईशा इरीका या इमारतीत सदनिका खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्यांना ३० जून २०११ रोजी ताबा मिळणार होता. प्रत्यक्षात मात्र त्यांना अकरा महिने उशिराने ताबा देण्यात आला. या संदर्भात भोसले यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागितली. या खटल्यात भोसले यांनी स्वत: बाजू मांडली. त्यांच्याकडील करारनामा आणि इतर कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर ग्राहक मंचाने भोसले यांच्या बाजूने निकाल दिला.
निकालात म्हटले आहे की, बांधकाम व्यावसायिकांनी विलंबाच्या काळासाठी भोसले यांच्या ३१ लाख ४७ हजार ४४७ रुपयांच्या रकमेवर नऊ टक्के दराने व्याज द्यावे. तसेच, मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी २५ हजार रुपये द्यावेत. तसेच, तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रुपये द्यावेत. आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडय़ांच्या आत आदेशाची पूर्तता करावी. या मुदतीत आदेशाची पूर्तता केली नाही तर भोसले यांच्या रकमेवर १२ टक्के व्याजदराने व्याज आकारले जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा