चारधाम यात्रेसाठी सात ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण रक्कम भरूनसुद्धा यात्रेला घेऊन न जाणाऱ्या अथर्व ट्रॅव्हल्स कंपनीला ग्राहक मंचाने त्यांनी भरलेले एक लाख ९७ हजार रुपये दावा दाखल झालेल्या तारखेपासून नऊ टक्के व्याजाने व्याजासह परत द्यावेत. त्याचबरोबर नुकसान भरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून दहा हजार रुपये देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत.  
ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य गीता घाटगे यांनी हा आदेश दिला. याबाबत ज्येष्ठ नागरिक विलास श्रीरंग बडवे, वासंती बडवे, (पिंपळेगुरव), विजयकुमार आंबादास तांबोळकर, त्यांची पत्नी विद्या (रा. धायरी), हेमंत सदाशिव हळवे (रा. पौड रस्ता, कोथरुड), प्रतिमा इंगोले आणि विमलाबाई कुकडे (रा. लोकमान्य कॉलनी कोथरूड) यांनी अथर्व ट्रॅव्हल्सच्या विरुद्ध ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. त्यानुसार मंचाने अथर्व ट्रॅव्हल्सचे मालक शिरीष खेडेकर (रा. सदाशिव पेठ) यांनी ही रक्कम तक्रारदारांना व्याजासह परत देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार हे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. या सर्वानी चारधाम यात्रेला जाण्यासाठी अथर्व ट्रॅव्हल्सकडे एकूण एक लाख ९७ हजार रुपये भरले होते. कंपनीने या सर्वाना यात्रेला जाण्याची तारीखही कळविली होती. त्यांची यात्रा २४ मे ८ जून  २०१३ दरम्यान निश्चित झाली होती. यात्रेची तिकिटेही बुक केल्याचे त्यांना कळविण्यात आले. मात्र, तारीख उलटून गेली तरी त्यांना फोन आलाच नाही. त्यानंतर कंपनीने त्यांना २७ मे रोजी जायचे असून राजधानी एक्सप्रेस रेल्वेची तिकीटे बुक केल्याचे सांगितले. ही एक्सप्रेस मुंबईहून निघणार असल्यामुळे त्यांना घेण्यास बस येईल म्हणूनही कळविले होते. पण, त्यांना घेण्यास बस वेळेवर न आल्यामुळे त्यांची एक्सप्रेस चुकली. त्यामुळे तक्रारदारांना आपली यात्रा रद्द करावी लागली. यात्रा रद्द झाल्यामुळे सर्वानी ट्रॅव्हल्स कंपनीकडे त्यांनी भरलेली रक्कम परत देण्याची मागणी केली. मात्र, सुरूवातीला त्यांना काहीच दाद दिली नाही. शेवटी कंपनीने त्यांना पुढील तारखेचे धनादेश दिले, पण ते बँकेत वटलेच नाहीत. तक्रारदारांनी सादर केलेल्या कागदपत्रावरून ट्रॅव्हल्स कंपनीने अनुचित व्यापार पद्धतीचा आवलंब करत सदोष सेवा दिल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर कंपनीला नोटीस पाठविली असता त्यांनी आपली बाजू मांडलेली नाही. त्यामुळे मंचाने कंपनीविरुद्ध एकतर्शी आदेश काढून तक्रारदारांची सर्व रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.

Story img Loader