रस्त्यात चहापाण्यासाठी गाडी थांबली असताना सर्व प्रवासी पुन्हा गाडीत बसल्याची खात्री न करता एका प्रवाशाला रस्त्यातच सोडून दिल्याच्या प्रकरणात नीता व्होल्वो या ट्रॅव्हल कंपनीला ग्राहक मंचने दणका दिला आहे. संबंधित प्रवाशाला नुकसान भरपाई म्हणून १५ हजार रुपये, तर तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश मंचचे नुकतेच दिले.
एस. एन. देशपांडे यांनी ग्राहक मंचकडे याबाबत तक्रार केली होती. देशपांडे हे भारतीय मजदूर संघाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. देशपांडे हे १ फेब्रुवारी २००५ रोजी नीता व्होल्वोच्या बसने मुंबईहून पुण्याकडे येत होते. ही गाडी द्रुतगती मार्गाने येत असताना चहापाण्यासाठी हॉटेलवर थांबली. गाडी पुन्हा पुण्याकडे घेऊन जात असताना चालकाने सर्व प्रवासी गाडीत बसल्याची खात्री न करताच गाडी पुढे नेली. या प्रकारात देशपांडे हे खालीच राहिले. त्यांनी तातडीने या कंपनीच्या दुसऱ्या बसमध्ये प्रवेश केला व त्यातील मदतनिसाला ही माहिती दिली. देशपांडे यांची बॅग निघून गेलेल्या गाडीत असल्याने संबंधित गाडीत संपर्क करून ही बॅक परिहार चौकात खाली उतरविण्याचे सांगण्यात आले. मात्र, ही बॅग उतरविण्यात आली नाही.
परिहार चौकात बॅग उतरविली नसल्याने देशपांडे हे पुणे रेल्वे स्थानकाजवळील बसच्या थांब्यावर गेले. मात्र, बसमध्ये बॅगच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना आणखी मनस्ताप सहन करावा लागला. मंचाने त्यांचा तक्रार अर्ज मंजूर केला. त्या प्रकरणात कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा स्पष्ट झाल्याचे सांगत दंडाचे आदेश देण्यात आले. 

Story img Loader