राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपील आणि तक्रारी दाखल करण्यासाठी पुण्यातील ग्राहकांना आता मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. राज्य ग्राहक मंचाच्या पुणे खंडपीठाचे उद्घाटन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
या वेळी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष आर. सी. चव्हाण, आयोगाचे सदस्य पी. बी. जोशी, पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश भोजराज पाटील, विभागीय आयुक्त चोकलिंगम, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायाधीश विकास किनगावकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना बापट म्हणाले, की जाहिरातीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ग्राहक हा राजा आहे की रंक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्राहकांना आजही कोठे न्याय मागायचा याचे प्राथमिक शिक्षण नाही. पुण्यात राज्य ग्राहक आयोगाचे खंडपीठ सुरू झाल्यामुळे पुण्यातील पक्षकारांना मुंबईला फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. या खंडपीठासाठी लागणारी जागा उपलब्ध करू देण्याचे आश्वासनही बापट यांनी या वेळी दिले.
चव्हाण म्हणाले, की राज्य ग्राहक मंचाच्या खंडपीठाचा प्रस्ताव मंजूर होऊन बरेच दिवस झाले. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. पुण्यात आता ग्राहक मंचाचे खंडपीठ झाले असून ग्राहकांनी आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी ग्राहक मंचाच्या पुणे खंडपीठासाठी पाठपुरावा करणारे वकील अ‍ॅड. हृषीकेश गानू, अ‍ॅड. मिलिंद महाजन, अ‍ॅड. ज्ञानराज संत, संजय गायकवाड, अ‍ॅड. विनायक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.  

Story img Loader