‘महावितरण’ने नवे वीजजोड देण्याच्या व्यवस्थेत बदल केल्यानंतर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ग्राहकांना वीजजोडासाठी कोटेशनच मिळत नसल्याने अनेक जण हैराण झाले आहेत. या प्रकारामुळे नवीन ग्राहक मिळाल्याने होणाऱ्या फायद्यापासून ‘महावितरण’लाही वंचित राहावे लागत आहे.
नवीन वीजजोड देण्यासाठी ‘महावितरण’कडून पूर्वीची व्यवस्था बदलून एक नवी यंत्रणा राबविण्यात येत आहे. मात्र, या व्यवस्थेत काही त्रुटी असल्याने नवीन वीजजोड देण्यासाठी वेळेत कोटेशनच निघत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा फटका अनेक ग्राहकांला बसला आहे. वीजजोड मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांना व्यवस्थेतील या त्रुटीने हैराण केले आहे.
याबाबत सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविले आहे. वीज सेवेचा कालावधीचे निश्चितीकरण असलेल्या ‘एसओपी’ अनुसार ग्राहकाने नव्या वीजजोडासाठी अर्ज केल्यानंतर सात दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून १५ दिवसांत कोटेशन दिले गेले पाहिजे. कोटेशननुसार पैसे भरल्यानंतर एक महिन्याच्या आत वीजजोड दिला गेला पाहिजे. मात्र, नव्या व्यवस्थेमुळे एसओपीचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात असल्याची तक्रार वेलणकर यांनी केली आहे. व्यवस्थेतील सुधारणेच्या नावाखाली ग्राहकांना त्रास काय दिला जात आहे. वीजजोड देण्यासाठी नवी यंत्रणा पूर्णपणे सक्षम नसताना ती का लागू केली गेली, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. एसओपीच्या नियमांनुसार ठरावीक कालावधीत वीजजोड दिला गेला नसल्यास संबंधितांना त्याची नुकसान भरपाईही मिळाली पाहिजे, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा