लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी गु्न्हा करण्यापूर्वी दारू आणि गांज्याचे सेवन केले होते. तांत्रिक तपासात अडथळे आणण्यासाठी आरोपींनी त्यांचे मोबाइल संच फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या साथीदाराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणाी अख्तर शेख (वय २७, रा. नागपूर), चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०, रा. डिंडोरी, रा. मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला आलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली होती. पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यासाठी ६० पथके तयार केली आहेत. शेखला सोमवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून ताब्यात घेण्यात आली. कनोजियाला बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या येवलेवाडीतून ताब्यात घेण्यात आले होते.

आणखी वाचा- ‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये पुण्यातील शाळा ठरल्या मानकरी… कोणत्या शाळांना मिळाली पारितोषिके?

याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी भिगवण पोलीस ठाण्यात लूटमारीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेखविरुद्ध पुणे ग्रामीण, नांदेड परिसरात नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याने वेगवेगळे साथीदार हाताशी धरून गुन्हे केले होते. ३ ऑगस्ट रोजी शेख, कनोजिया आणि पसार असलेल्या साथीदाराने दारु प्यायली. त्यानंतर त्यांनी गांजा ओढला. शेखने तरुणीवर पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर त्याच्यबरोबर असलेल्या साथीदारांनी तिच्यावर अत्याचार केले.

बोपदेव घाटात लूटमार करण्यासाठी जाण्यापूर्वी तिघांनी त्यांचे मोबाइल क्रमांक फ्लाईट मोडवर टाकले होते. तांत्रिक तपासात अडथळे आणणे, तसेच पोलिसांना सापडू नये म्हणून त्यांनी फ्लाईट मोडवर मोबाइल ठेवल्याचे उघडकीस आले आहे. शेख विवाहित असून, त्याची पत्नी नागपूरमध्ये राहायला आहे. त्याचे दोन महिलांशी अनैतिक संबंध आहेत. त्यांच्याकडेही त्यांचे येणे जाणे होते.

आणखी वाचा-अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांना मिळणार प्राध्यापक; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निवड समितीची रचना जाहीर

गुन्हा केल्यानंतर तीन दिवस पुण्यात

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या मागावर पोलीस होते. गुन्हा केल्यानंतर आरोपी तीन दिवस पुण्यात फिरत होते. ७ ऑक्टोबर रोजी ते एकत्र भेटले. त्यानंतर शेख नागपूरला गेला. नागपूरमध्ये तो चार दिवस राहिला. त्यचा साथीदार चंद्रकुमार कनोजियाला ११ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तो उत्तर प्रदेशातील प्रयागराजला पसार झाला.

एका आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी

याप्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी कनोजिया याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपीच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक युवराज हांडे आणि सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने कनोजियाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consumption of alcohol and drugs by the accused in the bopdev ghat gang rape case pune print news rbk 25 mrj