पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १२३ जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळून आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण आंबेगाव तालुक्यात आहे. आंबेगावमध्ये ३५ जलस्रोतांमध्ये दूषित पाण्याचे नमुने आढळून आले आहेत. २४०८ पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते, म्हणजे तपासण्यात आलेल्यांपैकी पाच टक्के स्रोत दूषित आढळले असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील पाण्यांचे नमुने एकत्रित करून तपासणीसाठी पाठविले जातात. प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासल्यानंतर अहवाल तयार करण्यात येतो. २० टक्क्यांहून कमी क्लोरीन असलेल्या गावांची संख्या चार आहे, त्यामध्ये जुन्नरमधील चिलेवाडी, अहिनवेवाडी, अंबेगव्हाण, तर शिरूरमधील साविंदने यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये या गावांमध्ये पाण्याची टाकीची दुरवस्था, जलवाहिन्यांना गळती, ठिकठिकाणी उकिरडा पडल्याची विदारक स्थिती आढळून आली. त्यानुसार संबंधित सर्व गावांच्या ग्रामपंचायतींना कळवण्यात आले आहे. नियमित शुद्धीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर पाणी शुद्धीकरणाच्या दृष्टीने टीसीएलचा वापर परिणामकारक वापर, आवश्यक तेथे तुरटीचा वापर तसेच पाण्यातील क्लोरीन तपासणीसाठी क्लोरोस्पोपचा वापर आणि या अनुषंगाने ठेवायच्या नोंदवह्या ठेवाव्यात. त्याचबरोबर पिणाच्या पाणी स्त्रोतांच्या शंभर फुट परिसरातील स्वच्छता करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

दूषित पाणी प्यायल्याने विविध आजारांचा त्रास

दूषित पाणी प्यायलामुळे आजारांना सामोरे जावे लागते. जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. जलजन्य आजारांमुळे गावांमध्ये साथ सुरू होण्याची भीती देखील असते.

तालुकानिहाय दूषित जलस्रोत

आंबेगाव – ३५, बारामती – आठ, भोर – दोन, दौंड – सहा, हवेली – १३, इंदापूर – १२, जुन्नर – आठ, खेड – सहा, मावळ – शून्य, मुळशी – तीन, पुरंदर – तीन, शिरूर – २६, वेल्हे – एक.